Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Sankrat Halwache Dagine

आधुनिक समाजातही हलव्याच्या दागिन्यांची मागणी

प्रतिनिधी | Jan 14, 2012, 08:52 AM IST

  • आधुनिक समाजातही हलव्याच्या दागिन्यांची मागणी

औरंगाबाद - संक्रांत सणाच्या तोंडावर ज्याप्रमाणे बाजारपेठा वाण आणि पतंगांनी सजली आहे त्याचप्रमाणे हलव्याच्या दागिन्यांनाही मोठी मागणी आहे. फक्त संक्रांतीच्या एका दिवसाकरिता असणारी ही बाजारपेठ चांगलीच उलाढाल करते. पूर्वी नववधू किंवा बाळाच्या पहिल्या संक्रांतीसाठी घरातील महिला हे दागिने स्वत:च बनवायच्या. मात्र, आता धकाधकीच्या जीवनात रेडिमेड दागिन्यांवर अवलंबून राहावे लागते. शहरातही अगदी मोजक्याच दोन-तीन दुकानांमध्ये हे दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
साखर महागल्याने दागिन्यांवर परिणाम नाही. साखरेचा भाव वाढल्याने हलव्याच्या दागिन्यांच्या किमतीदेखील चढतील असा अंदाज होता. मात्र, नियमित दर वाढीप्रमाणे फक्त दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
अनेक प्रकार सध्या उपलब्ध
महालक्ष्मी सेट, गीता सेट, पद्मिनी सेट, गौरी सेट, रेणुका सेट, कृष्ण सेट हे महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी कृष्ण सेट तर पुरुषांसाठी मोबाइल, नारळ, हत्ती आणि मोठी माळ अशा विविध प्रकारचे दागिने बाजारात आहेत. यामध्ये कंबरपट्टा,
कानातले, मंगळसूत्र, अंगठी, पाटली, वाकी, तन्मणी, बिंदी, मेखला, वेणी, गजरा, शाही हार, चापनथ, तोडे, जोडवे, पैंजण आणि लफ्फा अशा विविध दागिन्यांचा यात समावेश आहे.
दोन पिढ्यांपासून आम्ही हे दागिने बनवितो
माझ्या सासूबाई शांतीबेन पटेल यापूर्वी हे दागिने बनवून विकायच्या, या परिसरातील अनेक महिला तेव्हा संक्रांतीच्या दिवसात हा व्यवसाय करायच्या पण आता मात्र मोजक्याच ठिकाणी हे दागिने उपलब्ध आहेत. फोटो काढण्यासाठी याचा जास्त वापर होत असल्याने अनेकदा फोटोस्टुडियोमध्येच हे दागिने उपलब्ध होतात, याचा विक्रीवर परिणाम झाला आहे. झिरो साइझच्या हलव्याची विशेष मागणी यामध्ये केली जाते. तरीही हंगामात 50 ते 60 सेट्सची विक्री होते. अडीचशे रुपयांपासून एक हजारापर्यंतचे हलव्याचे दागिने सेट स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत.’’
तनुजा पटेल, दीपक स्टोअर
तीन महिने आधीपासूनच सुरू होते तयारी
काळ बदलला असला तरीही आधीच्या तुलनेत आताही हलव्याच्या दागिन्यांची क्रेझ कमी झालेली नाही. पूर्वी हलव्याचे दागिने हाताने बनविलेले असायचे पण आता आम्ही मशीनचा वापर करून बनविण्यात आलेले दागिने देतो. अनेकप्रकारचे सेट आमच्याकडे आहेत, महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा विविध गटांसाठी वेगवेगळ्या दागिने आहेत. हलव्याचे दागिने संक्रांतीला घालून फोटो काढण्याची परंपरा सर्वच समाजात आहे, कोणत्याही एका विशिष्ट समाजासाठी हे नाही. सर्व दागिन्यांच्या किमती सेटनुसार 400 ते 1150 रुपयांदरम्यान आहे.’’
कल्पना भावे, भावे अँड कंपनी

Next Article

Recommended