आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षात होणार संतसृष्टी, उल्कानगरीतील भूखंडावर प्रकल्प राहणार उभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संतांची भूमी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात येत्या दीड वर्षात संतसृष्टी अर्थात संतोद्यान आकारास येणार आहे. याबाबत डिसेंबर २०१३ मध्ये कार्यादेशही देण्यात आले. ३० महिन्यांच्या आत संतसृष्टी उभी करायची आहे. मॉडर्न आर्ट वर्क्सला हे काम मिळाले आहे. महापालिकेने निधी
वेळेत उपलब्ध करून दिल्यास येत्या दीड वर्षात संतसृष्टी उभी राहील, असे मॉडर्न आर्टने म्हटले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखीव असलेल्या उल्कानगरीतील भूखंडावर ही संतनगरी उभारण्याची प्रक्रिया २०१० पासूनच सुरू झाली होती. २०१३ ला कार्यादेश देण्यात आला. शहरात काव्य उद्यान
आहे, याच परिसरात
भारतमाता मंदिर आहे. संतांची महती कळावी यासाठी ध्यानगृह
असलेली संतसृष्टी
आता उल्कानगरीत उभी राहणार आहे.
अशी असणार संतसृष्टी
इ.स. १८०० पूर्वीच्या महाराष्ट्रातील सर्व संतांची माहिती, त्यांची ग्रंथसंपदा, छायाचित्रे, त्यांनी केलेले कार्य, त्यांच्या निवडक ओव्या किंवा अभंग यात असतील. यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बनका महार, सावता माळी, गोरा कुंभार, संत नामदेवांबरोबरच सुफी संतांचाही समावेश आहे. एक मोठे ध्यानगृह तेथे असेल. उल्कानगरीत यासाठी १ लाख ३० हजार चौरस फूट म्हणजेच जवळपास अडीच एकर जागा पालिकेने राखून ठेवली आहे.
भारतीय वृक्षांची लागवड
संतसृष्टीत प्रामुख्याने भारतीय वृक्षांची व रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यात तुळस, वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, पारिजातक, सब्जा, कडूनिंब आदींसह फुलझाडे असतील. आयुर्वेददृष्ट्या उपयुक्त वनस्पतींचीही लागवड करण्यात येणार आहे.
ज्योतीनगरात काव्य उद्यानापाठोपाठ संतोद्यान
माजी महापौर विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने ज्योतीनगरात काव्य उद्यान साकारले गेले. याची चर्चा राज्यभर झाली. त्याचप्रमाणे हे संतोद्यान आहे. शहराच्या वैभवात भर घालण्याबरोबरच नव्या पिढीला वैभवशाली संत परंपरेची माहिती व्हावी यासाठी हे उद्यान उभारण्याचे माजी उपमहापौर जोशी यांनी योजिले होते. ही संकल्पना सर्वांनाच आवडल्याने लगोलग प्रस्ताव मंजूर झाला.
रीतसर कार्यादेश : माजी उपमहापौर संजय जोशी यांच्या पुढाकारातून संतसृष्टीची संकल्पना समोर आली. सर्वसाधारण सभेत रीतसर प्रस्ताव ठेवण्यात आला. सभागृहाने यासाठी ४ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद केली. रीतसर निविदा प्रक्रिया झाल्यानंतर मॉडल आर्ट वर्क्स या संस्थेला १९ डिसेंबर २०१३ या दिवशी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी कार्यादेश दिला. त्यानुसार ३० महिन्यांच्या आत संतसृष्टी उभी करण्याची अट आहे.
पैसे येताच काम सुरू
Ã
संतसृष्टी हा अत्यंत चांगला प्रकल्प आहे. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी त्याची गरजही आहे; परंतु पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे हे काम सुरू होऊ शकले नाही. दैनंदिन कामातच कर रूपाने येणारे पैसे खर्च होतात. अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद आहे; पण तिजोरीत पैसे नसल्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही, पैसे येताच काम सुरू होईल.
सखाराम पानझडे, शहर अभियंता.
हे तर संस्कार केंद्र....
Ã
या प्रकल्पाकडे केवळ इमारत म्हणून बघता कामा नये. ते एक संस्कार केंद्र आहे. अलीकडे मुले टपऱ्यांवर फिरतात, त्याऐवजी या संतसृष्टीत गेले तर संतांची माहिती मिळेल, त्यांचे कार्यही समजू शकेल. चांगले संस्कार होतील. ध्यानगृहात बसल्याचा फायदा त्यांना आयुष्यभर होईल. भावी पिढीसाठी हा प्रकल्प व्हायला हवा. ही जागा सांस्कृतिक केंद्रासाठीच राखीव आहे.
संजय जोशी, माजी उपमहापौर
दीड वर्ष हातात
Ã
संतसृष्टी उभारणीसाठी अडीच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यातील एक वर्ष निघून गेले. महापालिकेने वेळेत निधी उपलब्ध करून दिला, तांत्रिक अडचणी दूर केल्या तर दीड वर्षातही संतसृष्टीची भेट औरंगाबादकरांना मिळू शकते.
निरंजन मडिलगेकर,
संचालक, मॉडर्न आर्ट वर्क्स
बातम्या आणखी आहेत...