आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंठेवारीसाठी सरल योजना, क्लिष्ट कागदपत्रांतून मुक्तता करण्याचा महापौरांनी घेतला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात ४० वॉर्डांत ४० हजारांपेक्षा जास्त मालमत्ता गुंठेवारी वसाहतीत आहेत. क्लिष्ट प्रक्रियेमुळे यापैकी निम्म्या मालमत्ता नियमित करण्यात आलेल्या नाहीत. ही बाब लक्षात घेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी सरल गुंठेवारी योजना अमलात आणली आहे. याअंतर्गत आता गुंठेवारी नियमितीकरणासाठी सहा दस्तऐवज तर टीडीआरसाठी एका अर्जासह एकच दस्तऐवज लागणार आहे.

गुंठेवारीमुळे शहरातील मोठा भाग सुविधांपासून वंचित राहिला. येथे सुविधा पुरवण्यासाठी नगरसेवकांकडून प्रशासनावर दबाव आणण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासनानेही तयारी केली. मात्र निम्म्यापेक्षा जास्त मालमत्ताधारकांनी गुंठेवारी नियमितीकरण केले नसल्याने सुविधा देण्यात अडचणी निर्माण झाल्या. तसेच या प्रकारामुळे मनपाचा महसूलही बुडत आहे. महसुलात वाढ करण्यासाठी २००१ पूर्वीच्या मालमत्ता नियमित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेळोवेळी कॅम्प लावले. मात्र त्यातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांच्या नाकी नऊ येत आहेत. याकडे नागरिकांनी लक्षच दिले नाही. गुंठेवारी नियमितीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढाकार घ्यावा यासाठी तुपे यांनी योजना अमलात आणली आहे. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणासाठी सहा प्रकारचे दस्तऐवज लागतील. तसेच टीडीआर घेण्यासाठी नागरिकांकडून सकारात्मक पाऊल उचलले जात नव्हते. त्यासाठी केवळ एकच अर्ज तयार करून त्यासोबत जमीन भूमापनची विद्यमान जमीन वापर नकाशाची प्रत जोडल्यास टीडीआर देणे सोपे होईल.

सवलत दिल्यावरच जास्त नियमितीकरण
सध्याच्या नियमानुसार मालमत्ता नियमितीकरणास अडचणी येणार आहेत. मात्र यात केवळ २००१ ऐवजी २००९- १० पर्यंतच्या मालमत्तांना सवलत देऊन नियमित करण्याचे पाऊल उचलल्यास ९० टक्के गुंठेवारीच्या अनधिकृत मालमत्ता अधिकृत होऊ शकतात.

प्रशासनासमोरील अडचणी
शासनाच्या नियमानुसार २००१ पूर्वीच्या मालमत्ताच नियमित करण्यात येणार आहेत. अशा मालमत्ता मोजक्याच असून त्यानंतरच्या मालमत्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात असल्याने सरल योजना राबवूनही प्रशासनासमोर गुंठेवारीच्या मालमत्ता नियमित करण्यास अडचणी येतील.

नवीन बदलानुसार लागणारी कागदपत्रे
मोजकाचमजकूर असलेला मनपाचा एक पानाचा अर्ज, भूखंड मालकीचा सातबारा, खरेदीखत, करारनामा साठेखत अथवा मुद्रांकावरील खरेदीखत, एक जानेवारीपूर्वीचे बांधकाम पुरावा वीज बिल, फोन बिल अथवा टॅक्स पावती, भूखंडावर बांधकाम असल्याचा अभियंता,आर्किटेक्टची नकाशा हमीपत्र द्यावे.

गुंठेवारीसाठी पूर्वी लागणारे दस्तऐवज
मालकीहक्क पुरावा, सातबारा अथवा मालमत्तांचा सहा महिन्याच्या आतील पुरावा, तो नसल्यास खरेदीखत करारनामा, मुख्त्यारपत्र, हमीपत्र, बांधकाम भूखंड २००१ पूर्वी असल्याचा पुरावा, २००१ पूर्वीची टॅक्स पावती, वीज बिल, टेलिफोन बिल, बांधकाम नकाशा सहा प्रतीत सादर करावे.

जेथे वसुली तेथे सुविधा
ज्या गुंठेवारी भागातील ९० ते ९५ टक्के मालमत्तांनी नियमितीकरणाचे गुंठेवारीचे पैसे भरले आहेत त्या ठिकाणी मनपाकडून सुविधा देण्यास काहीच अडचण राहणार नाही. तसेच यापूर्वी जेथे विकासकामे झालेली आहेत. - त्र्यंबक तुपे, महापौर
बातम्या आणखी आहेत...