आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराला बेटाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- टाळ-मृदंगाचा गजर व ग्यानबा-तुकारामांचा जयघोष करत दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीसाठी सराला बेट येथील सद्गगुरू गंगागिरी महाराज संस्थानच्या वारकऱ्यांची पायी दिंडी रविवारी (१२ जुलै) पंढरपूरकडे प्रस्थान झाली. या दिंडीची १५० वर्षांहून परंपरा असून ही दिंडी महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सराला बेटाचे सद्गगुरू गंगागिरी महाराज, सद्गगुरू नारायणगिरी महाराज आदींच्या प्रतिमा असलेल्या भव्य रथ आणि हजारो वारकऱ्यांसह मार्गस्थ झाली आहे.

सराला बेटावर नारायणगिरी महाराज यांच्या समाधीचे व गंगागिरी महाराज यांच्या पादुकांचे सर्वप्रथम पूजन करण्यात आले. त्यानंतर समाधी मंदिराला प्रदक्षिणा मारण्यात आली. दिंडीत सर्वात पुढे पांढराशुभ्र अश्व, त्यापाठोपाठ हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी, त्यांच्या मागे टाळ-मृदंगाच्या गजरात माउलींचा जयघोष करणारे भजनी मंडळ, कलश-तुळशीधारी महिला मंडळ व त्यांच्या मागे पांढरी टोपी व पेहरावातील वारकरी सहभागी झाले होते. या वेळी रामगिरी महाराज म्हणाले की, जो पंढरपूरपर्यंत पायी वारी करतो त्याच्या सर्व दु:खांचे निवारण पांडुरंग करतो. यंदा सुरुवातीला दमदारपणे हजेरी लावणारा पाऊस महिनाभरापासून दडून बसला आहे. दिंडी परत येईपर्यंत सर्व नद्या-नाले ओसंडून वाहू दे व सर्व शेतकऱ्यांना सुखी कर, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे आपण करणार असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी दिंडीला निरोप देण्यासाठी बांधकाम समितीचे सभापती संतोष जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, जि. प. सदस्य मनाजी मिसाळ, लक्ष्मण भुसारे, मधुकर महाराज, चंद्रकांत महाराज, दत्तू खपके, ज्ञानेश्वर टेके, किरणकुमार गायकवाड, प्रमोद सोमवंशी, जनार्दन गागरे, दादासाहेब जगताप, चंद्रकांत जोशी, दत्तू बोर्डे, मच्छिंद्र वाघमारे, मच्छिंद्र थोरात आदींसह वारकरी व सरला बेट परिसरासह वैजापूर तालुक्यातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मार्गे जाईल दिंडी
सराला बेटाहून निघालेली ही दिंडी उंदीरगाव, बेलापूर, राहुरी, देहरे, वाकोली, आंबिलवाडी, कोकणगाव, पाटेगाव, करमाळा, तिभोरा, कन्हेरगाव, दिवनमळामार्गे पंढरपूरला पोहोचेल. या दिंडीसोबत जिल्हा परिषदेने पाण्याचे टँकर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य सेवाही वारकऱ्यांना मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...