आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यक्षगानने "शारंगदेव'ची सांगता, अभिजात कलांचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पं.कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांच्या चतुरस्र गायकीने शारंगदेव महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. पार्वती दत्ता यांच्या संशोधनपूर्ण कथ्थक प्रस्तुतीने रसिकांना तृप्त केले, तर यक्षगान या उडपी कलावंतांच्या सादरीकरणातून समृद्ध अभिजात कलांचे दर्शन घडवत पाचव्या शारंगदेव महोत्सवाची सुरेख सांगता झाली.

कलापिनी कोमकली यांनी राग केदारने गायनाची सुरुवात केली. "जोगी जागो रे' हा विलंबित बडा ख्याल गाताना त्यांनी लयकारीतून रसिकांना जिंकले. "जो दिया सुनहरी' ही द्रुत बंदिश सादर करताना स्वरांची केलेली नजाकत गानसाधनेचा परिचय देणारी होती. कुमार रचित गौरी बसंत रागातील मध्यलयीतील बंदिश स्वरांनी आसमंत भारून टाकणारी होती. "आज निज घाट बिच फाग मचाइओ' या भक्तिरचनेने त्यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला. आवर्तने घेत समेवर येण्याचे त्यांचे कौशल्य दाद मिळवणारे होते.

कथ्थकचेमनोहारी सादरीकरण
"गोकुलमें गोपिका गोविंद संग खेले होली' या होळीच्या दुसऱ्या दिवसाचे वर्णन करणाऱ्या प्रस्तुतीने कलावंतांनी रंगमंच प्रवेश केला. गोपिका कृष्णासह होळीचे रंग खेळल्यावर दुसऱ्या दिवशी स्नान करून येतात. मात्र, कृष्णाच्या रंगात रंगलेल्या गोपिकांच्या चेहऱ्यावर झळकणारा निराळाच रंग कधीच मिटणारा आहे, याचे वर्णन यामध्ये साभनिय मांडण्यात आले होते. यानंतर विलंबित तीनतालातील ठाठ, उठाण, तत्कार, तोडे, तुकडे आणि परण यांचे अर्थपूर्ण सादरीकरण त्यांनी शिष्यांसह केले. विशेष म्हणजे रसिकांशी संवाद साधत सादरीकरण करण्याची त्यांची शैली फक्त सादरीकरण सुंदर करणारी नव्हती, तर रसिकांना अधिक रसास्वाद देणारी होती.
यक्षगानातून जटायू मोक्षप्रसंग पर्वणी

उडपीयेथील कलावंतांनी सादर केलेले यक्षगान ही औरंगाबादकर रसिकांसाठी पर्वणी होती. पहिल्यांदाच शहरात ही कला सादर करण्यात आली. ८०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन असलेल्या या कलेमध्ये नृत्य आणि नाट्य यांचा सुरेख समन्वय आहे. दोन ते अडीच फूट मोठे मुखवटे घालून कलावंत करत असलेले रंगमंचीय सादरीकरण विलक्षण होते. शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्यानंतर रावणाकडे जाऊन विलाप करणारी शूर्पणखा सीताहरण करण्यासाठी भावाला तयार करते. मारिचच्या मदतीने केलेले सीताहरण आणि त्यात जटायूने सीतेला वाचवण्यासाठी दिलेले प्राण यांची आर्त कहाणी सामर्थ्याने कलावंतांनी सादर केली.