आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarder Vallabhbai Patel Statue Issue At Aurangabad

सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छतागृह, आंदोलनाचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शहागंज येथील पुतळ्याजवळ स्वच्छतागृह उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्याला गुजराती समाज विकास मंडळाने विरोध दर्शवला आहे. हे काम तत्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मंडळाने दिला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सूचनेवरून स्वच्छतागृह बांधण्यात येत असल्याचे मनपाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

शहागंज येथे नगर परिषदेच्या काळात उद्यान विकसित करण्यात आले. त्यात वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृती पुतळा विकसित करण्यात आला असून एक घड्याळाचा टॉवरही उभा आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हा पुतळा दुर्लक्षित अवस्थेत होता. एप्रिल 2010 मध्ये राजाबाजार वॉर्डातून शिवसेनेतर्फे जगदीश सिद्ध नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या वेळी त्यांनी नवीन पुतळा उभारणी तसेच परिसर विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी काही पावलेही उचलली. नव्या पुतळ्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. दरम्यानच्या काळात पुतळ्याजवळ पोलिस चौकी उभारणीची मागणी झाली. ती मनपा प्रशासनाने मान्य केली. मात्र, प्रत्यक्षात ऑगस्ट 2011 मध्ये स्वच्छतागृह उभारणीचे काम सुरू झाले. त्यास गुजराती मंडळाने विरोध दर्शवला. शहागंजात अन्य ठिकाणी जागा उपलब्ध असताना पुतळ्याजवळ स्वच्छतागृह कशासाठी, असा त्यांचा सवाल होता. 26 ऑगस्ट 2011 रोजी तत्कालीन महापौर अनिता घोडेले यांनी मंडळाचे अध्यक्ष अनिल पटेल यांना एक पत्र दिले. त्यात म्हटले होते की, सध्या प्रगतिपथावर असलेले स्वच्छतागृहाचे काम आयुक्तांच्या मान्यतेनुसार रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी तेथे मनपाचे हजेरी सेंटर बांधण्यात येईल.

या निर्णयाचे मंडळाने स्वागत केले. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी येथे पुन्हा स्वच्छतागृह बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. स्लॅबवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम होत असल्याने मंडळाच्या सदस्यांना शंका आली. त्यांनी कंत्राटदाराकडे विचारणा केली असता येथे हजेरी सेंटर होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी 21 फेब्रुवारी 2013 रोजी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनाही निवेदन दिले. ज्या महापुरुषाने जिवाचे रान करून भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या पुतळ्याशेजारी स्वच्छतागृह बांधणे भारतीय मनाला रुचणारे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.


"येथे हजेरी सेंटरच करण्याचे ठरले होते. त्याऐवजी स्वच्छतागृह बांधणीचा निर्णय कधी झाला आणि कुणी घेतला याविषयी मला काहीही माहिती नाही. शहागंज परिसरातील व्यापार्‍यांच्या सोयीसाठी येथे स्वच्छतागृहाची अत्यंत आवश्यकता असली तरी पुतळ्याशेजारी ते नको, असे माझे वैयक्तिक मत आहे." -जगदीश सिद्ध, नगरसेवक

मला माहिती नाही
"मीच या कामासाठी सूचना केली होती. कारण, या भागात स्वच्छतागृह अत्यंत गरजेचे आहे. आम्हालाही पटेलांच्या कर्तृत्वाचा रास्त अभिमान आहे. त्यांच्या पुतळ्याची अवमानना होऊ नये यासाठी स्वच्छतागृह आणि पुतळ्यामध्ये भिंत बांधण्यात येत आहे. या कामासाठी गुजराती मंडळाच्या सदस्यांचे मन वळवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे."
-चंद्रकांत खैरे, खासदार

कशासाठी हवे स्वच्छतागृह?
> चेलीपुरा, राजाबाजार, शहागंज, सराफा ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे.
> जुन्या किराणा चावडी पोलिस स्टेशनजवळ एकच स्वच्छतागृह आहे.
> दररोज दहा हजार लोक या बाजारपेठेत येतात.
> त्यांच्यासाठी शहागंज हेच मध्यवर्ती ठिकाण आहे. अन्य खुल्या जागा सर्वांसाठी सोयीस्कर नाहीत.

'पुतळ्याचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. या भागात येणार्‍या हजारो लोकांची सोय व्हावी. त्यांना उघड्यावर विधी करावे लागू नयेत यासाठीच हे स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. शहागंज चमन मध्यवर्ती ठिकाण आहे हेही समजून घेतले पाहिजे. गुजराती मंडळाच्या सदस्यांना आम्ही विनंतीपत्रही पाठवणार आहोत.'
-एम. डी. सोनवणे, शहर अभियंता