आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारिकाचा इन कॅमेरा जबाब नोंदवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात मुलींना विकणाऱ्या टोळीचा सखोल शोध घेण्यासाठी मिसारवाडीतील पीडित महिला सारिका आणि तिच्या आईचा न्यायालयात इन कॅमेरा जवाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सारिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला घाटी रुग्णालयातून सुटी देऊन बालसुधारगृहात हलवण्यात आले आहे.

३० नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी मिसारवाडीतील साईनगरात राहणाऱ्या महिलांनी पुढाकार घेत अमानुष छळ होत असलेल्या सारिकाची अग्रवाल कुटुंबीयांच्या तावडीतून सुटका केली. तिच्या जबाबावरून सिडको पोलिस ठाण्यात पती संजय अग्रवाल, सासू आशा राजेंद्र अग्रवाल, नणंद दीपा राजेंद्र अग्रवाल, दीर सागर राजेंद्र अग्रवाल, शरद राजेंद्र अग्रवाल या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कोठडीत झालेल्या चौकशीत सारिकाला तिची मावशी सुवर्णा ऊर्फ शकुंतला वंजारे आणि मामा विठ्ठल पवारने ९५ हजार रुपयांत अग्रवाल कुटुंबाला विकल्याचे समोर आले.
त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या नेतृत्वातील पथकाने सारिकाची मावशी सुवर्णा, मामा विठ्ठल तसेच विक्री व्यवहारातील दलाल सूर्यनारायण आणि सुरेखा बवाने यांना अटक केली.

जबाब सर्वात महत्त्वाचा
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलींची विक्री करणाऱ्या या टोळीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी जबाब सर्वात महत्त्वाचा आहे. जबाबातून आम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत.
१]टोळीने आतापर्यंत मुलींना कुठे विकले?
२] विकलेल्या मुली कुठे आहेत?
३, या मुलींना कायमचे विकण्यात आले आहे की काही महिने किंवा वर्षांकरिता?
४] सारिकावर होणारे अत्याचार हा विकृतीचा भाग होता की अन्य कोणते कारण होते?
५] मुली विकणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार कोण आहे?

अनेक राज्यांत टोळी सक्रिय
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचे सदस्य गरीब कुटुंबे हेरून त्यांच्याशी भावनिक जवळीक साधतात. मानलेली नाती प्रस्थापित करतात. नंतर मुलींच्या विवाहाचे आणि त्या मोबदल्यात मोठ्या रकमेचे आमिष दाखवून विक्रीचा व्यवहार करतात. विवाह सोहळ्याला टोळीतील काही जण उपस्थित राहत असल्याने मुलीची विक्री झाल्याचे उघड होत नाही. देशातील विविध राज्यांत ही टोळी सक्रिय आहे.

पोलिस झाले नातेवाईक
सारिका प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पाडवी त्यांचे तीन सहकारी करत आहेत. दहा दिवसांपूर्वी सारिकाची सुटका झाली तेव्हा ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तिची मन:स्थिती नव्हती. हे लक्षात घेऊन पथकाने तिची नातेवाइकांसारखी काळजी घेतली. घरगुती जेवणाच्या डब्यापासून तर मोबाइलमध्ये बॅलन्स टाकून देण्यापर्यंत मदत केली. त्यामुळे तिच्यात झपाट्याने प्रगती झाली. शुक्रवारी तिला घाटीतून सुटी देण्यात आली असून सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...