आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारिका केवळ १३ वर्षांची, |दहा दिवसांनंतर सादर केला अल्पवयीन असल्याचा पुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मिसारवाडीतील अग्रवाल कुटुंबीयांच्या अमानुष छळाला बळी पडलेल्या सारिकाचे लग्न झाले होते तेव्हा ती केवळ १३ वर्षांची होती, असे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी शनिवारी न्यायालयासमोर त्याचा पुरावाच सादर केला. या नव्या खुलाशामुळे अत्याचाराचे हे प्रकरण आणखीच गंभीर झाले असून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पोस्को) आरोपींवर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. सारिकाला विकल्याचा आरोप असलेल्या आरोपींना शनिवारी विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्यासमोर उभे केले असता त्यांना १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटना घडल्यानंतर दहा दिवसांनंतर पोलिसांनी सारिकाचा प्रवेश निर्गम उतारा आणि वैद्यकीय अहवाल मिळवला. या उताऱ्यानुसार तिचे सध्याचे वय १३ वर्षे सहा महिने १५ दिवस आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी ती केवळ १३ वर्षांची होती, तर वैद्यकीय अहवालानुसार सध्याचे तिचे वय १५ वर्षे सहा महिने आहे. पोलिसांनी उशिरा का होईना वयाचा पुरावा सादर केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले आहे. त्यामुळे या लग्नाची माहिती असणारे आणि लग्नाला उपस्थित मंडळीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहू शकतात. मिसारवाडीतील साईनगरात राहणाऱ्या सारिकाला तिच्या मावशीनेच विकल्याचा दावा पोलिसांनी केला असून मावशीसह पाच जणांना अटकही करण्यात अाली आहे. या सहा जणांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी करत आहेत.

१६ डिसेंबरपर्यंत कोठडी
मावशीसुवर्णा ऊर्फ शकुंतला वंजारे, मामा विठ्ठल पवार, धुराजी सूर्यनारायण (दलाल), सुरेखा बवाने, छाया रामेश्वर सोनवणे आणि अाशा साळवे यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांच्या पोलिस कोठडीत १६ पर्यंत वाढ केली.

पोलिसांची उडाली धांदल
आरोपी शकुंतला वंजारे हिला न्यायाधीशांनी पोलिसांविषयी काही तक्रार आहे का, असे विचारल्यानंतर तिने मला शिवीगाळ केली जाते. जेवायला दिले जात नाही. जेवण दिले तर ताटाला लाथ मारली जाते, असे सांगितले. यावरून न्यायाधीशांनी उपस्थित तपास अधिकाऱ्याकडे विचारणा केली. याशिवाय सारिकाचा वैद्यकीय अहवालही पोलिसांना न्यायालयासमोर सादर करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी किमान डायरी तरी योग्य ठेवावी, अशी सूचना देऊन अशा गंभीर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी किमान काळजी घेणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी खडसावले.

आरोपींची बाजू
सारिका रुग्णालयात असताना मावशी आणि मामांनीच तिची काळजी घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांनाच अटक केली. सारिकाने एक डिसेंबरला दिलेल्या जबाबात असे काहीच म्हटले नाही. अग्रवाल कुटुंबीयांना याच लोकांनी पकडून दिल्याने ते आरोप करतीलच. त्यांच्याच जबाबावरून ही कारवाई करण्यात आली. यातील छाया आणि आशा या दोघी केवळ लग्नाला गेल्या होत्या. तरीही दोघींना पोलिसांनी अटक केली, अशी बाजू आरोपींच्या वतीने अॅड. शिवाजी जोगदंड , अॅड. के. एन तायडे आणि काशीनाथ शिंदे यांनी मांडली.

पोलिसांची बाजू
पीडित मुलगी अल्पवयीन असताना तिचे लग्न लावले. आरोपींनी तिला अग्रवाल कुटुंबीयांना विकले. हे एक रॅकेट असून यातील आरोपींना पकडण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक आहे. पीडित मुलीला विकून जे पैसे आरोपींनी मिळवले ते त्यांच्याकडून हस्तगत करायचे आहेत. या रॅकेटने अजून किती मुलींना विकले आहे याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलासह सारिकातर्फे बाजू मांडत असलेल्या २० वकिलांनी केला.

६८ हजारांची मदत : वकीलसंघाकडून पीडित सारिकाला ६८ हजार ६५ रुपयांची मदत देण्यात आली. जिल्हा न्यायालयातील पाचशेवर अधिक वकिलांनी हे पैसे जमवले. अॅड. जी. डी. पवार यांनी ही रक्कम पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आणि उपनिरीक्षक राजकुमार पाडवी यांच्याकडे सुपूर्द केली.

ती वधू दक्षिणा
{अग्रवाल कुटुंबाकडून लग्नाच्या वेळी दिलेली रक्कम म्हणजे वधूदक्षिणा आहे. प्रत्येक समाजाच्या विविध पद्धती आहेत. अग्रवाल समाजात लग्नाच्या वेळी वधूदक्षिणा द्यावी लागते, असा बचाव आरोपी पक्षाने केला.

{लग्नाच्या वेळी मानधने नावाच्या व्यक्तीकडे हे पैसे देण्यात आले होते. मात्र, तो अजून पोलिसांच्या ताब्यात नाही, अशी माहिती आरोपींच्या नातेवाइकांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...