आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satar Deolai Bypolls : Senior Not Happy With Kishanchand Tanawani

सातारा-देवळाई पोटनिवडणूक: किशनचंद तनवाणींचा विजय ज्येष्ठांच्या जिव्हारी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईत शिवसेनेचे ‘पाणी’पत झाले. भाजपने एक जागा जिंकून आपला प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले, याची सर्वत्र चर्चा असली तरी भाजपमध्ये मात्र शांतताच आहे. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा नवखा गट वगळता जुन्या-जाणत्यांना याचा आनंद झाला नसल्याचे दिसून येते.

तनवाणी यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली अन् एक जागा जिंकून दिली. त्यामुळे त्यांना श्रेय देण्यासाठी कोणी पुढे येत नाही की विजय पक्षाचा असल्याचेही कोणी म्हणत नाहीत. तनवाणी यांनी अधिकृतपणे बोलताना विजयाचे सर्व श्रेय हे पक्षाला दिले. अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जुन्या कार्यकर्त्यांना या विजयाचा फारसा आनंद झाला नसल्याचे दिसून येते.

या दोन्हीही वाॅर्डांत प्रचारासाठी आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी उपमहापौर संजय केणेकर आदींनी अल्प वेळ दिला होता. आम्ही प्रचाराला आलो होतो, हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच काहींनी हजेरी लावली. मतदानाच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी जालना येथे भाजपचा सामुदायिक विवाह सोहळा होता. त्याच्या तयारीत आम्ही आहोत, असे सांगून अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले, तरीही येथे भाजपला एक जागा मिळाली अन् त्याचे श्रेय तनवाणी यांच्याकडे गेले. त्यामुळेच भाजपच्या अन्य गटांतून विजयाच्या जल्लोषाचे वृत्त नाही. जल्लोष तर दूरच या मंडळींचे चेहरेही उजळले नाहीत, असे दिसते. त्यामुळे विजय पक्षाचाच आहे, आमचे संघटन मजबूत आहे, असा युक्तिवाद स्थानिक नेत्यांकडून करण्यात येतो.

यश की अपयश
विधानसभा निवडणुकीत या भागातून भाजपला मताधिक्य होते, त्यामुळे येथून भाजप विजयी होणारच होते, असे काहींनी सांगितले तर काहींनी ही निवडणूक प्रतिक्रिया देण्यासारखी नसल्याचे मत खासगीत व्यक्त केले. सव्वा वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्हीही वाॅर्डांतून भाजपला साडेनऊशे मतांची आघाडी होती. ती देवळाईत कायम राहिली, तर सातारा वाॅर्डात ती कमी झाली. त्यामुळे हे यश समजायचे की अपयश असा प्रश्न काही राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी नाव पुढे करण्याच्या अटीवर उपस्थित केला.

हा दुहेरी विजय
खरेतर विजयाचे श्रेय तनवाणींबरोबच स्थानिक कार्यकर्त्यांकडे द्यायला हवे. तनवाणी यांचे मॅनेजमेंट अप्रतिम होते. हा दुहेरी विजय आहे. शिवसेना ज्या पद्धतीने कामाला लागली होती. खासदार, आमदार, मंत्री सर्वच प्रचारात होते. तरीही आम्ही विजय मिळवला अन् खैरेंना चित केले. हा पक्षाचा विजय आहे. गट-तटाचा नव्हे. डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष.
पुढे वाचा.. सातारा, देवळाईतील आश्वासनपूर्तीसाठी भाजप राबवणार ‘पाणी अडवा’ अभियान , बालेकिल्ला गमावल्यावर शिवसेनेत टोलवाटोलवी