औरंगाबाद- दोनवर्षांपासून सुरू असलेला सातारा-देवळाई नगर परिषदेचा वाद आता अंतिम टप्प्यात असून नगर परिषद बरखास्तीच्या अधिसूचनेवर मागवण्यात आलेले आक्षेप शासनाने फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी दिवसभर सातारा-देवळाईचा मनपात समावेश झाल्याच्या चर्चेला उधाण आले. अधिकारी वर्गाकडूनही याला दुजोरा देण्यात आला. मुंबई येथे मनपा समावेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजकीय हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायत, नगर परिषद, नंतर महानगरपालिका, पुन्हा नगर परिषद अखेर महानगरपालिका असा प्रवास सातारावासीयांना करावा लागला. ११ जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार नगर परिषद बरखास्तीच्या अधिसूचनेवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यासंदर्भात निर्णय अपेक्षित असतानाच अवघ्या दहा दिवसांमध्ये सरकार प्रशासनाने सर्व आक्षेप, सूचना फेटाळून हा भाग महानगरपालिकेतच समावेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.