आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या ‘जंजाळा’तून खैरे बाहेर; भाजपमध्येही गृहकलह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाईच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चांगलीच तापली असली तरी शिवसेना भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणही तसे समोर येऊ लागले आहे. रामदास कदमांचे निकटवर्ती राजेंद्र जंजाळ यांच्यावर देवळाईची धुरा सोपवल्याने नाराज झालेले खासदार चंद्रकांत खैरे प्रचारापासून दूर आहेत, तर भाजपमध्ये शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पुढाकार घेतल्याने मूळ भाजपचे नेते, पदाधिकारी प्रचारापासून चार हात दूरच राहिले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीनेही आपापल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याचेच चित्र दिसत आहे.
सातारा देवळाई हे दोन नवीन वाॅर्ड ताब्यात यावेत यासाठी राजकीय पक्ष झुंजत असल्याचे वरचे चित्र आहे. त्या चित्राखाली वेगळीच लढाई पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांत पक्षांतर्गत राजकारण जोरात सुरू असून सातारा देवळाईत ते पाहायला मिळत आहे. याला एकही पक्ष अपवाद नसून अंतर्गत लाथाळ्या सगळीकडेच सारख्याच असल्याचे या घडामोडींवरून दिसून येते.

शिवसेनेत दुफळी
शिवसेनेतील रामदास कदम चंद्रकांत खैरे यांचे गट काम एकमेकांच्या विरोधात सक्रिय असतात. येथेही ते सक्रिय झाले आहेत. प्रारंभी खासदार खैरे यांनी दोन्ही वाॅर्डांच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पण नंतर ते दूरच झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार खैरे यांनी तिकीट वाटपातही रस घेतला होता. सायली जमादार यांचे तिकीट निश्चित झाले असताना खैरे यांनी राधाकृष्ण गाायकवाड यांच्या पुतणीसाठी तिकीट मिळवण्यात यश मिळवले.

खैरे यांना दोन्ही वाॅर्डांची सूत्रे हवी होती. पण पालकमंत्री रामदास कदम यांनी देवळाई या प्रतिष्ठेच्या वाॅर्डाची जबाबदारी राजेंद्र जंजाळ यांच्याकडे सोपवली. जंजाळ यांच्यामुळे खैरे यांनी नंतर या वाॅर्डात लक्षच घातले नाही. साताऱ्यात थोडेफार लक्ष घातले आहे. शिवसेनेचे नेते याबाबत भाष्य करायला तयार नाहीत. उलट सामूहिक विवाह सोहळ्याची मोठी जबाबदारी असल्याने खासदार खैरे तिकडे लक्ष घालीत आहेत, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

मूळ भाजपवाले नाराज
तिकडेशिवसेनेत अंतर्गत झुंज सुरू असताना भाजपही मागे राहिलेला नाही. साताऱ्यात भाजप पहिल्यांदा लढत आहे, पण या निवडणुकीत शहरप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी पुढाकार घेतल्याने चित्र बदलले आहे. मागील वर्षी शिवसेनेतून भाजपत आलेल्या तनवाणी यांनी आपल्यासोबत आपली यंत्रणाही सोबत आणली. तनवाणी यांच्याकडे शहराध्यक्षाची सूत्रे सोपवल्यानंतर मूळ भाजपवाले नाराज झाले आहेत.

त्यामुळे सातारा देवळाईत तनवाणींनी पुढाकार घेताच पक्षाचे जुने मूळ पदाधिकारी नेते आपणहूनच बाजूला झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रमोद राठोड हेही प्रचारात उतरले आहेत. पण बाकीचे नेते शहराची वेस ओलांडून इकडे यायला तयार नाहीत. एवढेच काय, याच परिसरातील मूळची भाजपची मंडळीही हातचे राखूनच प्रचार करीत आहेत.

काँग्रेस अन् राष्ट्रवादीतही तेच
जीगत शिवसेना-भाजपची तीच काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. काँग्रेस दोन्ही वाॅर्डांत मैदानात असली तरी शहरातील नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. आमदार सुभाष झांबड वगळता मोठे नेते फिरकलेच नाहीत. शहराध्यक्ष सय्यद अक्रम थोडेफार लक्ष घालत आहेत, पण फिरोज पटेल आड येत असल्याने तेही दोन हात दूरच आहेत. राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार नामदेव बाजड यांचा प्रचार तर आपल्याच यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे. राष्ट्रवादीचे कोणीही या वाॅर्डात प्रचाराला आल्याचे की त्यांना बोलावल्याचेही ऐकिवात नाही.