आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांच्या सुट्यांत उमेदवारांचे "घर घर चलो' अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाई वाॅर्डांचा प्रचार भरात आला असताना सलग दोन सुट्या आल्याने गुरुवारी(दि. १४) शुक्रवारी(दि. १५) जास्तीत जास्त मतदारांना गाठण्यासाठी जवळपास सर्वच उमेदवारांनी ‘घर घर चलो अभियान’ राबवण्याचे प्लॅनिंग केले आहे. यामुळे साताऱ्यात प्रचाराचा खरा धुरळा या दोन दिवसांत पाहायला मिळणार अाहे.
सातारा देवळाई या दोन वाॅर्डांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. साताऱ्यात पल्लवी गायकवाड (शिवसेना), सायली जमादार(काँग्रेस) सुरेखा बाविस्कर(भाजप) या तिघींत चुरशीची लढत आहे. हा वाॅर्ड अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहे. दुसरीकडे देवळाई वाॅर्डात हरिभाऊ हिवाळे (शिवसेना), अप्पासाहेब हिवाळे(भाजप) राजू नरवडे(भाजप) यांच्यात चुरस आहे. कोणतीही नागरी सुविधा नसणारा किमान ६० हजार लोकसंख्येचा हा भाग आता मनपात समाविष्ट होत असल्याने नागरिकांना मोठी उत्सुकता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप यांना हा भाग आपलाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून देण्याची शक्तिपरीक्षा मानली जात आहे. ‘दिव्य मराठी’ने निवडणुकीच्या प्रारंभीच ही निवडणूक पाण्यावर लढली जाणार असल्याचे विस्तृत सर्वेक्षण करून समोर आणले होते. प्रचारही आतापर्यंत तसाच झाला आहे. आता शुक्रवारी प्रचार संपत असून शेवटच्या दोन दिवसांत या वाॅर्डांत घमासान पाहायला मिळणार अाहे. सातारा देवळाई या परिसरात नोकरदारांची संख्या अधिक असल्याने या मतदारांना गाठण्यासाठी शेवटचे दोन दिवस आलेल्या सार्वजनिक सुट्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. गुरुवारी (दि. १४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुटी अाहे, तर शुक्रवारी(दि. १५) रामनवमीची सुटी आहे. या दोन्ही सलग सुट्यांमुळे घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांना गाठण्यासाठी सर्वच उमेदवारांनी फील्डिंग लावली आहे. सकाळी पासूनच प्रचाराला बाहेर पडून ११ वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोकांना भेटणे सायंकाळी नंतर पुन्हा मतदारांना गाठणे यासाठी उमेदवारांची यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवसेना भाजपने शहरातील आपले मनुष्यबळ या कामासाठी तैनात केले असून या टप्प्यात दोन्ही पक्षांचे नगरसेवक आपापल्या वाॅर्डांतील नागरिकांचे या भागातील नातेवाईक पै-पाहुण्यांना गाठून उमेदवारांना आपल्या बाजूला वळवण्याचा निकराचा प्रयत्न करणार आहेत.

समारोप होणार दणक्यात
शिवसेनेने गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांची सभा आयोजित केली असून या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याची तयारी सुरू आहे. तिकडे भाजपने मोठ्या सभांच्या नादी लागता मतदारांच्या गटांना ‘निरोप’ पोहोचवण्याची खास भाजप पद्धत वापरण्याची तयारी सुरू केली आहे. याशिवाय शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठमोठ्या प्रचारफेऱ्या काढून दणक्यात समारोप करण्याचीही तयारी सुरू झाली आहे.