आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांच्याच "गाठी' देत उमेदवारांची प्रचाराची "गुढी'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई वॉर्डांतील निवडणुकीला अवघे दहा दिवस बाकी असून परिसराचा विकास करू, अशा आश्वासनांच्या "गाठी' देत प्रचाराचा पहिला टप्पा शांततेत पार पडला. कॉर्नर बैठका, प्रत्यक्ष गाठीभेटी, जातीय समीकरणे जुळवण्यावरच उमेदवारांचा भर असून याद्वारेच प्रचाराची "गुढी' उभारली जात आहे.
एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट झालेे. दोन्ही वाॅर्डांतील कडवी स्पर्धा उरलेला अवधी पाहता जोरदार प्रचारास सुरुवात होईल, अशी चिन्हे होती; परंतु चुरशीची लढत होत असल्याने उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटींवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मोठी रॅली, ढोल-ताशे यापासून दूर राहणेच पसंत केले. परंतु मतदानाचा दिवस जवळ येत असल्याची जाणीव होताच दुसऱ्या टप्प्यात रॅली काढण्यास सुरुवात झाली आहे. देवळाई वॉर्डात सेना-भाजपमध्ये प्रमुख लढत होत असल्याचे चित्र निर्माण केले असले तरी जातीय समीकरण पाहता मतदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळतील, अशी चिंता उमेदवारांना भेडसावत आहे. त्यामुळे मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला जात असल्याची चर्चा आहे.

भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी अनेक दिवसांपासून वॉर्डात मुक्काम ठोकला आहे. आतापर्यंत दोन्ही वॉर्डांत प्रत्येकी १३ ते १४ कॉर्नर बैठका, दोन मोठ्या रॅली झाल्या आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे स्वत: लक्ष देत असले तरी देवळाई वॉर्डाची नगरसेवक राजेंद्र जंजाळ, तर साताऱ्याची माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली असून घरोघरी भेटी देण्यासह विरोधी गटाच्या भूमिकेविरुद्ध नियाेजन करण्यावर भर दिला जात आहे. काँँग्रेस पक्षाने प्रचारासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडून शुक्रवारीच प्रचार कार्यालयाचे उद््घाटन केले. त्याआधी उमेदवारांनी स्वत:च घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली असली तरी शहरातील पदाधिकारी मात्र शनिवारपासून प्रचारात उतरतील, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही रॅलीला पूर्णपणे फाटा देत कॉर्नर बैठकावरच लक्ष केंद्रित केले आहे. १० ते १५ एप्रिलदरम्यान भाजप, शिवसेना ज्येष्ठ नेत्यांच्या सभा आयोजित करणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे असून कोणते नेते प्रचारासाठी उतरतात, यावर प्रचाराची दिशा ठरेल आणि त्यातूनच जयपराजयही निश्चित होईल.
देवळाई वॉर्डात संघाची भूमिका ठरेल महत्त्वाची
औरंगाबाद - शिवसेनेचाबालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा देवळाई परिसरात शिवसेना भाजप आमने-सामने उभे ठाकल्याने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेष: चुरशीची लढाई असणाऱ्या देवळाई वाॅर्डात संघाची समजली जाणारी सुमारे १८०० मते एकगठ्ठा पडणार की विभागली जाणार हा कळीचा प्रश्न आहे. दुसरीकडे संघाने आतापर्यंत या निवडणुकीत काहीच भूमिका घेतली नसून तूर्तास ‘वेट अँड वाॅच’वर राहत दोन्ही पक्षांना गॅसवर ठेवले आहे.
सातारा वाॅर्ड अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव अाहे. तेथेही शिवसेना, भाजप काँग्रेस अशी तिहेरी लढत आहे. तरीही देवळाई वाॅर्ड सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. या वाॅर्डात खरी लढत शिवसेनेचे हरिभाऊ हिवाळे, भाजपचे अप्पासाहेब हिवाळे काँग्रेसचे राजेंद्र नरवडे यांच्यात आहे. तिन्ही उमेदवारांसाठी तिन्ही पक्षांनी यंत्रणा कामाला लावली आहे. प्रामुख्याने जातीपातीच्या व्होटबँकांवर आधारित गणित सर्वांनीच मांडले असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावल्या आहेत, पण हिंदू व्होट बँकेवर डोळा असलेल्या शिवसेना भाजपला जास्तीत जाास्त मतदान ओढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत. त्यात संघाचे स्थान महत्त्वाचे ठरत आहे.

दोन वाॅर्डांत संघाच्या एकूण आठ शाखा चालतात. त्यात एकट्या देवळाई परिसरातील तीन शाखांत १८०० च्या अासपास उपस्थिती असते. ही १८०० त्यांच्यामुळे प्रभावित होणाारी मते कोणाकडे जातात याकडे लक्ष लागले आहे. याबाबत संघाच्या काही ज्येष्ठ स्वयंसेवकांशी चर्चा केली असता संघाने अद्याप या निवडणुकीत लक्ष घातले नाही, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. भाजप शिवसेनेतील सूत्रांनी मात्र ही १८०० ची संख्याच आमच्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मान्य केले.

भाजप सेनेच्या सूत्रांनुसार ही मते आपलीच आहेत, असा दावा दोघांनाही आताच करणे शक्य नाही. उमेदवार कसा आहे यावर संघ भूमिका ठरवेल, असे शिवसेनेला वाटते तर आतापर्यंत शिवसेनेचाच उमेदवार असल्याने त्यांना मतदान करणारा हा हिंदुत्ववादी मतदार आता भाजपकडे वळेल याची आशा आहे, पण संघात चालणारी ‘निरोप’ पद्धत पाहता १५ तारखेपर्यंत काय निरोप येतो याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे संघ पदाधिकाऱ्यांशी असलेले चांगले संबंध पाहता शिवसेनेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. १०० टक्के नाही तरी जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी सेना सरसावली आहे. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगरात झालेला संघ विरुद्ध शिवसेना हा संघर्ष ताजा असल्याने शिवसेनेबाबतची नाराजी काम करून जाईल, अशी भाजपला अाशा आहे.

शिवसेना आणि भाजप हे पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांचे शहरातील प्रमुख पदाधिकारी दिवसभर सातारा-देवळाईत तळ ठोकून आहेत. कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन सुरू असलेल्या प्रचारात जातीय समीकरणावरच भर दिला जात असून त्यानुसारच वॉररूममध्ये प्रचाराचे नियोजन सुरू आहे. सकाळी ते ११ दरम्यान काही ठिकाणी उमेदवार, तर काही ठिकाणी उमेदवाराचे आई, भाऊ, बहिणी प्रचार करत आहेत. सायंकाळी शहरातील नगरसेवक, पदाधिकारी कॉर्नर बैठका घेत मतदारांना गळ घालत आहेत.