आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित सातारा नगर परिषदेत जाण्याची देवळाईकरांची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- येत्या काही महिन्यांत अस्तित्वात येण्याची शक्यता असलेल्या सातारा नगर परिषदेमध्ये आपल्या गावाचा समावेश व्हावा, अशी लगतच्या देवळाईकरांची इच्छा आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने पूर्वीच संमत केला आहे. महानगरपालिकेने 18 गावांची वाट लावली असल्याने कोणत्याही परिस्थितीत आम्ही तिकडे जाणार नाही. आम्हाला सातारा नगर परिषदेतच समाविष्ट करा, अशी मागणी सरपंच करीम मदन पटेल व सदस्यांनी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

करीम पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी शुक्रवारी दुपारी थोरात यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या प्रस्तावाची प्रत दिली आणि त्याचबरोबर आमच्या गावाचा समावेश या नव्या नगर परिषदेत करा, अशी जोरदार मागणी केली. गावच्या परिसरातील 60 टक्के भाग बांधकामांनी व्यापला आहे. ग्रामपंचायतीकडे तेवढी आर्थिक क्षमता नाही. नगर परिषदेत समावेश झाल्यास निधी मिळेल आणि या परिसराचा विकास होऊ शकेल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. या वेळी नवाज पटेल, अफजल पटेल, फय्याज पटेल, सादिक पटेल, इस्माईल पटेल, कडू पटेल आदी सदस्य उपस्थित होते.

पूर्वी या दोन गावांची एकच ग्रामपंचायत होती. आता नगर परिषदही एकच असावी, अशी आमची मागणी असून 1 मे या दिवशीच आम्ही तसा प्रस्ताव मंजूर केला आहे. मनपात समाविष्ट झालेल्या 18 गावांची वाट लागली.
-करीम मदन पटेल, सरपंच, देवळाई.

सातार्‍याला काय फायदा ?
नव्याने अस्तित्वात येणारी नगर परिषद आकाराने नि लोकसंख्येनेही मोठी होईल. संयुक्तपणे विकास करणे शक्य होण्याबरोबरच शासनाकडून जास्तीचा निधी मिळवण्यास मदत होईल.

देवळाईची लोकसंख्या - 10 हजार 600

देवळाई नगर परिषदेत गेल्यास काय होईल?
सातार्‍यासोबत विकास आराखडा करणे शक्य होईल. संयुक्तपणे पाणीपुरवठा, ड्रेनेजच्या योजना आखता येतील. रस्तेही एकत्रितपणे करणे शक्य होईल. एकत्रितपणे निधीही खेचता येईल.

> मलनिस्सारण व्यवस्था नाही, रस्त्यांची दुरवस्था
> पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज योजनेसाठी अपेक्षित खर्च- 32 कोटी (प्रस्ताव राज्याकडे पाठवले आहेत)
> गांधेली व फरदरी तलावातून होतो पाणीपुरवठा
>ग्रामपंचायत सदस्य - 11
>परिसर- 550 हेक्टर
>मालमत्ता करापोटी महसूल- वार्षिक 9 लाख