आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला सातारा नगर परिषदेच्या सत्तेचे डोहाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या अडीच दशकांपासून औरंगाबाद महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश आले नाही. मात्र, नव्याने स्थापन होणार्‍या सातारा नगर परिषदेत आपल्यालाच सत्ता मिळावी यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या नगर परिषदेत देवळाई ग्रामपंचायतीच्या समावेशाची तयारी त्यांनीच सुरू केली आहे. या दोन्हीही ग्रामपंचायतींत सध्या काँग्रेसचेच बहुमत असल्याने शहराला लागून असलेली पहिली नगर परिषदेत काँग्रेसच्याच ताब्यात येईल, असा दावा केला जात असून आम्हीच सत्ताधारी असा अविर्भावही दिसून येत आहे.

40 हजारांवर लोकसंख्या झालेल्या सातार्‍याचा औरंगाबाद महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगर परिषद निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या सहा महिन्यांत ही नगर परिषद अस्तित्वात येणार हे जवळपास नक्की झाले आहे. सातारा ग्रामपंचायतीत सध्या काँग्रेसची सत्ता आहे. बाजूलाच असलेल्या 11 हजार लोकसंख्येच्या देवळाईत तर 11 पैकी 8 जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. हे गाव नव्या नगर परिषदेत आले तर काँग्रेस आणखी मजबूत होणार हे उमगल्याने आता या गावचा समावेश करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाला आहे.

शुक्रवारी (5 जुलै) देवळाईचे सरपंच करीम पटेल यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन रीतसर मागणी केली. थोरात यांनाही यामागील गणित माहिती असल्याने देवळाई हे गाव सातारा परिषदेत येण्यासाठी काय करावे लागेल, याच्या काही टिप्स त्यांनी दिल्या. तुम्ही रीतसर प्रक्रिया पूर्ण करा, पुढचे मी बघतो, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा काँग्रेसच्याच ताब्यात असल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास आणखी दुणावलेला दिसतो.

देवळाईकरांना काय करावे लागेल?
सातारा नगर परिषदेसाठी लवकरच हरकती मागितल्या जातील. त्यात आम्हाला वगळावे, अशी मागणी काहींकडून होऊ शकते. नेमके त्याच वेळी आमच्या गावाचा समावेश करावा, अशी मागणी आल्यास त्याचा प्राधान्याने विचार होऊ शकतो.

>दोन्ही मिळून एकूण जागा 28
काँग्रेस 16
शिवसेना 8
अपक्ष 4

>देवळाई 11एकूण जागा
8 काँग्रेस
3 शिवसेना

>सातारा 17 एकूण जागा
8 काँग्रेस
5 शिवसेना
4 अपक्ष


जिल्हा काँग्रेसच्याच ताब्यात
>सिल्लोड-काँग्रेस
>पैठण- काँग्रेस-राष्ट्रवादी
>वैजापूर-राष्ट्रवादी
>गंगापूर- काँग्रेस
>कन्नड-काँग्रेस
>खुलताबाद -काँग्रेस

>सातारा, देवळाई हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पहिला नगराध्यक्ष आमचाच होईल, यात शंका नाही.
-करीम पटेल, सरपंच, देवळाई.

सत्ता आमचीच
>ग्रामपंचायत आणि नगर परिषदेची निवडणूक वेगवेगळी असते. परिषदेत मतदारसंघ मोठे असतात. त्यामुळे दोन्ही गावांत सत्ता आहे, म्हणजे पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल, असे म्हणता येणार नाही. सत्तेचे डोहाळे त्यांना कायम लागलेले असतात. शहराप्रमाणे आम्हीच येथे सत्ता मिळवू.
-संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

>दोन्हीही ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत आणि नगर परिषदेवरही आमचीच सत्ता राहील. देवळाईचा समावेश झाल्यास आमची सत्ता निर्विवाद असेल. सत्ता यावी यासाठी प्रयत्न करतोय, असे नाही. 2015 मध्ये महानगरपालिकाही काँग्रेसच्याच ताब्यात असेल.
-अँड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष, काँग्रेस.