आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताराकरांसाठी गणराय आले नगर परिषद घेऊन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आज वाजतगाजत आगमन हाेत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना गेल्या दीड वर्षापासून चर्चेत असलेल्या सातारा व देवळाई ग्रामपंचायतीला गुरुवारी नगर परिषदेचा दर्जा मिळाला. स्थापनेबरोबरच या नव्या स्वायत्त संस्थेला ब दर्जा देण्यात आला. पहिली निवडणूक होईपर्यंत औरंगाबादचे तहसीलदार येथे प्रशासक असतील.
जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर गुरुवारी दुपारी प्रधान सचिवांनी स्वाक्षरी केली अन् ही नगर परिषद अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या नगर परिषदेचा स्थापना दिन नेमका कोणता असेल हे लवकरच स्पष्ट होईल. ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असल्यामुळे या संस्थेला ब वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विक्रम कुमार तसेच जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी यास दुजोरा दिला.
सातारा परिसराने मनपात समाविष्ट व्हावे किंवा तेथे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था असावी, असा मतप्रवाह होता. देवळाई ग्रामपंचायतीने मनपात न येण्याचा निर्णय घेतल्याने यासाठी स्वतंत्र नगर परिषद होणार हेही नक्की झाले होते. मात्र, नगर परिषद फक्त साताऱ्यासाठी होणार की त्यात बाजूचेच देवळाईही असणार हे नक्की होत नव्हते. देवळाई ग्रामपंचायतीने ठराव घेऊन साताऱ्याच्या नगर परिषदेत सहभागी होण्याचे ठरवल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. मात्र, लोकसभा, मराठवाडा पदवीधरची आचारसंहिता लागल्यामुळे निर्णय लांबणीवर पडला. १५ ऑगस्टला घोषणा होण्याबरोबरच नवीन नगर परिषद अस्तित्वात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, तोही मुहूर्त हुकल्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही परिषद अस्तित्वात येते की नाही, असा प्रश्न होता.
अशी असेल रचना
मौजे सातारा १ ते २१ व ७६ ते ३५६ गट क्रमांक, देवळाई गट क्रमांक १ ते १४५
परिसीमा पूर्व : बाळापूरची शीव, पश्चिम : इटखेडा व कांचनवाडी शीव (महापालिका हद्द) दक्षिण- सिंदोन-भिंदोन आणि उत्तर महानगरपालिका हद्द, औरंगाबाद. सध्या या परिसरात अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यावर नियंत्रण मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. नगर परिषदेच्या निर्मितीमुळे विकास शक्य होईल. शहरालगतच नवे सत्ताकेंद्र उदयास येईल. पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना आखणे आव्हान आहे.
फुलंब्रीचे काय?
सोयगाव, फुलंब्री या ग्रामपंचायतींच्याही नगर परिषदा होणे अपेक्षित होते, परंतु सातारा-देवळाईसोबत याचा विचार करण्यात आलेला नाही. त्याचा निर्णय नंतर होईल, असे पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
नवे कारभारी
शासनाने आदेश काढताना औरंगाबादच्या तहसीलदारांना नवीन नगर परिषदेचे प्रशासक केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत होती. मात्र, प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती नसल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले.
शासनाने आदेश काढताना औरंगाबादच्या तहसीलदारांना नवीन नगर परिषदेचे प्रशासक केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत होती. मात्र, प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती नसल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले.