आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग मोकळा: सातारा परिसरातील 50 हजार नागरिकांना मिळणार दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा परिसर आणि शहानूरवाडी सीमेवरील अतिक्रमण काढून बीड बायपासला जोडण्यासाठी रस्ता द्यावा आणि सातारा ग्रामपंचायत हद्दीतील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे तीन महिन्यांत काढण्यात यावीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिले. या निर्णयामुळे सातारा परिसरातील 50 हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

न्यू विद्यानगर कॉलनी ते रेणुका माता मंदिर या 300 ते 500 फूट अंतरावर अतिक्रमण झाल्याने साईनगर, सम्राटनगर या परिसरातील लोकांचा बीड बायपासशी संपर्क तुटला होता. खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे कारवाई झाल्यास येत्या तीन महिन्यांत हा रस्ता मोकळा होईल. सातारा ग्रामपंचायतीतील गट नं. 91 व 107, 20, 21 या गटातील रहिवाशांच्या वतीने पी.व्ही. औरंगाबादकर व अन्य काही नागरिकांनी यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत केंद्र व राज्य सरकारच्या 23 कार्यालयांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. एस. एस. डांबे काम पाहत आहेत. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आलोक शर्मा, राज्य सरकार अँड. साहेबराव कदम, सिडकोतर्फे अँड. अनिल बजाज, मनपातर्फे अँड. एन. बी. खंदारे काम पाहत आहेत. इतर प्रतिवादींतर्फे अँड. अनूप पाटील, अँड. एस. व्ही. अदवंत, अँड. उत्तम बोंदर, अँड. व्ही. सी. पाटील, अँड. पी. पी. मोरे, अँड. पी. एन. सोनपेठकर काम पाहत आहेत.

रहिवाशांची गैरसोय होणार दूर
राधा मंगल कार्यालयाकडून न्यू विद्यानगरकडे जाणारा नाला बुजवून त्यावर दुकाने थाटण्यात आली. भराव टाकल्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता आहे. खंडपीठाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल.

खंडपीठाचे निरीक्षण
खंडपीठाने आदेश देताना सर्व कार्यालये अतिक्रमण काढण्यासंबंधी टोलवाटोलवी करत असल्याचे निरीक्षण नोंदवले. जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित कार्यालयांना निर्देश देऊन रस्ता मोकळा करावा. सातारा ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी व शहर पोलिस आयुक्त यांनी मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे तीन महिन्यांत काढावीत, असे आदेश देण्यात आले.

याचिकेत मांडलेल्या समस्या
0 सातारा ग्रामपंचायत आणि शहानूरवाडी सीमेच्या रस्त्यावरील नाला बुजवून बीड बायपास रस्त्यालगत व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत.
0 गट नं. 91 आणि इतर परिसरातील मोकळ्या जागांवरही अतिक्रमणे झाल्याने परिसरातील नागरिकांना मोकळी मैदाने शिल्लक राहिली नाहीत.
0 बीड बायपास हा राष्ट्रीय महामार्ग असून, दोन्ही बाजूंनी अंतर्गत रस्ते (सर्व्हिस रोड) सोडलेले नाहीत. ग्रीनबेल्ट नसून या जागांवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.
0 सातारा परिसरात लोकसंख्या वेगाने वाढत असून, त्यामुळे नागरी समस्या मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत.