आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूसंपादन करून रस्ता लवकर पूर्ण करा; जिल्हाधिकार्‍यांचे तहसीलदारांना आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा परिसरातील न्यू विद्यानगर कॉलनीकडून रेणुकामाता मंदिर कमानीकडे जाणार्‍या शिवेवरील अतिक्रमण काढण्यासाठी या जागेचे सगळे जुने रेकार्ड सादर करा, शिवेव्यतिरिक्त आसपासची जागाही संपादित करा आणि लवकरात लवकर रस्ता मोकळा करा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी तहसीलदार विजय राऊत यांना दिले. यासाठी तत्काळ मनपा, टीएलआर, बीडीओंसह सर्व संबंधित विभाग व अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

शहानूरवाडी आणि सातारा गाव यामधील हद्दीवर अतिक्रमण करून 35 वर्षांपासून वापरात असलेला रस्ता गिळंकृत केल्याचा डीबी स्टारने पर्दाफाश केला. त्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांची या प्रकरणी भेट घेतली व आता तुम्हीच या प्रकरणात स्वत: लक्ष घालावे व हा रस्त्याचा गुंता सोडवावा, असे निवेदन केले. अतिक्रमण तर काढाच, शिवाय आसपासची जमीनही रस्त्यासाठी संपादित करा, अशी मागणीही त्यांच्याकडे केली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदार विजय राऊत यांना समक्ष बोलावून या जागेचे संपूर्ण जुने रेकॉर्ड तीन दिवसांत सादर करण्याचे आणि संबंधित अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले. शिवाय शिवेवरील अतिक्रमण काढून रस्त्याचा तिढा सोडण्यासाठी हालचाली लवकर सुरू करा, असे आदेश तहसीलदार राऊत यांना दिले.

काय म्हणतात जबाबदार....

लवकर निर्णय घेणार
शिवेवर रस्ता नसल्यास आमदारांनी सांगितल्याप्रमाणे भूसंपादनाचा निर्णय घेणार आणि या लोकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणार. याबाबत तहसीलदारांना जुने रेकॉर्ड मागितले आहे. संबंधितांची बैठक ही बोलावली आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ.
- विक्रम कुमार, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकार्‍यांनी आश्वासन दिले
तहसीलदारांमुळे हा गुंता वाढत गेला. अतिक्रमण काढा व गरज पडल्यास भूसंपादनही करा, अशी मागणीच मी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यांनीही तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता रस्ता होणार यात शंका नाही. हा रस्ता झाल्यास अपघातांचे प्रमाणही कमी होईल.
- संजय शिरसाट, आमदार

मी विरोधात नाही
गट क्रमांक 91 व 107 मध्ये शीव आहे, पण ती आमच्या मालकीहक्कात आहे. पूर्वी शिवेवर रस्ताच नव्हता, पण पाऊलवाट पडल्याने तो रस्ता आहे, असा लोकांचा गैरसमज झाला. मी उपसरपंच असताना हा रस्ता जोडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मूळ रेखांकनात नोंद केली होती. मी लोकांचा रस्ता अडवणार नाही, पण काही लोकांनी माझी विनाकारण बदनामी केली. जमीन माझी असून माझ्यावर अन्याय होत आहे.
-बहादूर पटेल, माजी उपसरपंच

सगळे पुरावे आहेत
आमच्याकडे शीव रस्ता असल्याचे सर्व सरकारी पुरावे आहेत. शासनानेही हे कबूल केले आहे, पण आता वेळकाढू धोरण स्वीकारले जात आहे. आम्ही जमीन मागत नाही.लोकांसाठी रस्ता मागत आहोत. ही आमची मागणी आहे. बहादूर पटेल यांच्याशी आमचे वैर नाही. ते आमचे शेजारी आहेत. आमचे वैयक्तिक भांडण नाही. त्यांनीच शेजारधर्म पाळावा.
-पी. व्ही. औरंगाबादकर, तक्रारदार