आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांनी रब्बी साधणार, यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अल निनोने काढता पाय घेतल्यानंतर यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. परिणामी राज्यातील सर्व प्रकल्पात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा झाला आहे. वर्षभरापूर्वी अर्थात सहा ऑक्टोबर २०१५ रोजी राज्यातील सर्व प्रकल्पांत ४३.३२ टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण ८२.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. चार वर्षांपासून हुलकावणी देणारा नैऋत्य मोसमी पाऊस यंदा महाराष्ट्रावर चांगला मेहेरबान झाल्याने यंदा रब्बी साधणार असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नांदेड येथील एम.जी.एम.खगोल अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनीसांगितले, सध्या महाराष्ट्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस देईल. त्यानंतर राज्याच्या बहुतेक भागांतून पाऊस काढता पाय घेण्याची चिन्हे आहेत. कोकणात ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पाऊस राहील.

रब्बीचा पेरा वाढणार : डॉ. एस. बी. पवार (कृषीविस्तार विद्यावेत्ता, व.ना.म.कृ.विद्यापीठ, परभणी)
यंदा परतीचा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कोरडवाहू ज्वारीची पेरणी जमिनीतील ओलाव्यानुसार २० ऑक्टोबरपर्यंत उरकावी. ओलिताची सोय असल्यास ज्वारीची पेरणी ३० ऑक्टोबरपर्यंत करावी. जिरायती गव्हासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत पेरणी करावी. ओलिताची सोय असेल तर गव्हाची पेरणी एक ते १५ नोव्हेंबर या काळात करावी. उशिरात उशिरा १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करावी.

लघु प्रकल्प : ६१% साठा
राज्यातील एकूण २८७३ लघु प्रकल्पांत यंदा आतापर्यंत ६०.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण केवळ १५.६३ टक्के होते. मराठवाड्यातील ८३७ लघु प्रकल्पांत मागील वर्षीच्या याच काळातील ०.२९ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ७०.२४% पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्प : ८०% साठा
राज्यात एकूण २४७ मध्यम प्रकल्प आहेत. त्यात वर्षभरापूर्वी ५२.४० टक्के पाणीसाठा होता, यंदा तो ८०.०४ टक्के आहे. नाशिक विभागातील ५३ मध्यम प्रकल्पात यंदा ७९.२७ टक्के पाणीसाठा आहे, गेल्यावर्षी तो ५२.९४ टक्के होता . अमरावती विभागातील २४ मध्यम प्रकल्पांत सध्या ९१.३७ टक्के पाणीसाठा असून वर्षभरापूर्वी हेच प्रमाण ६०.२६ टक्के होते. नागपूर विभागातील ४२ प्रकल्पांत गतवर्षीच्या ७५.०८ टक्के तुलनेत सध्या ८५.३३ टक्के पाणीसाठा अाहे. मराठवाडा विभागातील एकूण ७९ मध्यम प्रकल्पांत मागील वर्षी ११.५७ टक्के पाणीसाठा होता यंदा तो ७४.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मोठे प्रकल्प : ८८% साठा
राज्यात एकूण १३९ मोठे प्रकल्प आहेत. त्यात सध्या ८७.५१ टक्के पाणीसाठा असून वर्षभरापूर्वी मोठ्या प्रकल्पात ४७.७५ टक्के पाणीसाठा होता. नाशिक विभागातील २१ मोठ्या प्रकल्पात सध्या ९४.४४ टक्के पाणीसाठा आहे. वर्षभरापूर्वी हेच प्रमाण ५४.२९ टक्के होते. अमरावती विभागातील १० धरणांत सध्या ७२.०१ टक्के पाणीसाठा आहे, वर्षापूर्वी याच धरणांत ५८.१८ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील १६ प्रकल्पांत ६६.८८ टक्के पाणीसाठा आहे. वर्षापूर्वी हेच प्रमाण ५७.७० टक्के होते. मराठवाड्यातील ४५ मोठ्या प्रकल्पांत सध्या ७२.५४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पात केवळ ७.९५ टक्के पाणीसाठा होता.

येलदरी २३.०२%
विष्णुपुरी ९७.१२%
जायकवाडी : ७७.०६%
निम्न दुधना : ९९.५२%
निम्न तेरणा : १००%
बातम्या आणखी आहेत...