आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सतीश चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोदी लाटेवर स्वार भाजप उमेदवाराचा दणकून पराभव करत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात विजयाचे निशाण फडकवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांची लवकरच मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभेत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करणार्‍या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांची जागा चव्हाण यांना मिळणार असून, आठवडाभरात त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता खात्रीशीर सूत्रांनी वर्तवली.

लोकसभेच्या वेळी मोदी लाटेच्या झंझावातात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची अक्षरश: धूळधाण झाली. पुढे महिनाभरानेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. ती सहज जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपला होता; पण सतीश चव्हाण यांनी पहिल्याच पसंतीच्या मतांवर विजय मिळवून भाजपला धक्का दिला. त्यांच्या यशामुळे मराठवाड्यातील मोदी लाट ओसरण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत उचलता येईल. या इराद्यानेच चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा निर्णय झाला आहे.

पक्षविरोधी कारवायांचा फौजियांना फटका:
फौजिया खान यांना अल्पसंख्याक चेहरा म्हणून मंत्रिमंडळात घेण्यात आले होते पण त्यांनी मराठवाड्यात पक्षासाठी फारशी भरीव कामगिरी केली नाही, अशी पक्षर्शेष्ठींची धारणा आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत त्यांनी परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराविरूद्धच प्रचार केल्याने नाराज झालेल्या पक्षर्शेष्ठींनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या जागी चव्हाण यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

दांडगा जनसंपर्क, भक्कम नेटवर्क
राष्ट्रवादीकडे मराठवाड्यात सध्या तरी सतीश चव्हाण यांच्याइतका सर्व दृष्टीने तगडा नेता दुसरा नाही. आहेत ते नेते त्यांच्या जिल्ह्यापुरतेच र्मयादित आहेत. त्यामुळे विभागाच्या आठही जिल्ह्यांत दांडगा जनसंपर्क व भक्कम नेटवर्क असलेला नेता विधानसभा निवडणुकीत फायद्याचा ठरेल, असे चव्हाण यांची वर्णी लावण्यामागचे गणित आहे.

(फोटो - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण)