आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीत साध्या उपायांतून वाचवा पिके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. मानवी आरोग्यावर थंडीचा परिणाम जाणवतो. तसाच तो पिकांवरही होतो. तापमानात चढ-उतार झाला की त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. तापमानाबाबत पिके संवेदनशील असतात. अतिथंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारा आणि गारा यामुळे पिकांचे होणारे नुकसान साध्या उपायांतून टाळता येते. कृषी शास्त्रज्ञांनी त्याबाबत ‘दिव्य मराठी’ला सांगितलेले उपाय..
फळझाडांवर परिणाम
> आंब्याचा मोहर जळण्याची शक्यता असते.
> केळीची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही.
> पपईच्या झाडांची वाढ थांबते, फळांची प्रत खालावते, काही वेळा झाडे मरतात.
> मोसंबी, डाळिंब, लिंबू व संत्री या फळझाडांची वाढ खुंटते, फळधारणा होत नाही.
> द्राक्षवेलींची वाढ मंदावते, फुलो-यावर वाईट परिणाम, मणी गळतात, कोवळी फूट, पाने तसेच मण्यांची वाढ थांबते.

उपाययोजना
पूर्वदक्षतेचे उपाय : फळबागेभाेवती वारा प्रतिरोधक झाडे लावावीत, त्यासाठी शेवगा, पांगरा, मलबेरी, ग्लिरिसिडिया यांची निवड करावी. फळबागेतील झाडे एक-दोन वर्षांची असतील तर रब्बीत आंतरपीक घ्यावे. त्यासाठी हरभरा, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा यासारखी जमिनीवर पसरणारी पिके निवडावीत.
नियंत्रणाचे उपाय : थंडीची लाट असताना फळबागेला सायंकाळी विहिरीचे एक हलके पाणी द्यावे. या पाण्याचे तापमान जास्त असते, त्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. झाडांच्या दोन ओळीत, बांधावर पहाटेला शेकोट्या पेटवाव्यात. खोडाजवळ, आळ्यांमध्ये, गवत, पालापाचोळा, गव्हाचा भुसा आदींचे आच्छादन द्यावे. केळीच्या घडाभोवती, तसेच खोडाभोवती कोळीचीच पाने गुंडाळावीत. फळझाडांना पालाशयुक्त खत किंवा राख काही प्रमाणात द्यावे. कोरडवाहू हरभ-यासाठी पीक फुलो-यात असताना 2 टक्के युरिया किंवा 2 टक्के डीएपीची फवारणी करावी.

थंडीने नेमके काय होते
विभागीय कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले, हिवाळ्यात राज्यातील अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली उतरतो. त्यामुळे आंबा, केळी, द्राक्षे, मोसंबी, पपई, बोर, डाळिंब, चिकू, पेरू आदी फळझाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. पिकांचे श्वसन, प्रकाशजन्य संयोग, बाष्पोच्छवास, अन्नद्रव्यवहन या महत्त्वाच्या क्रिया तापमानावर अवलंबून असतात. अतिथंड हवामानामुळे झाडांच्या पेशीतील पाणी गोठते, तसेच पेशींच्या कणांमधील पाणी विविध प्रक्रियांसाठी खेचले जाते. पेशीतील पाणी नष्ट होऊन पेशी मरतात. खोड, फांद्यांचा आतील भाग काळसर पडतो, कोवळी पाने, नवी फूट व फांद्या सुकतात, बेचक्यातील पेशीजाल मरते, खोडाची साल तडकते, मुळांवरही असाच परिणाम होतो.