आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेह, लडाखमध्ये जाऊन "बेटी बचाव'वर जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समाजात वाढलेले स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण आणि महिलांवर होणारा अत्याचार यावर जनजागृती करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहेत; परंतु देशातील अनेक दुर्गम भागात दरदिवशी महिलांचा छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात. अशा परिस्थितीत शहरातील भ्रमंती करणारा तरुणांचा समूह लेह, लडाखच्या विरळ लोकवस्तीच्या वाड्या- वस्त्यांवर जाऊन "बेटी बचाव, बेटी पढाव'वर जागृती करत आहे. बुलेटवर प्रवास करण्याची हौस भागवणारे १३ रायडर्स समाजहितासाठीही प्रयत्न करत आहेत.
जग बदलायचे असेल तर आपल्यापासूनच त्याची सुरुवात करावी लागते. ही बाब लक्षात घेत रायडर्सनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. याची सुरुवातही अतिशय रोचक झाली. काही मित्रमंडळी सहज गप्पा मारत असताना आपला छंद जोपासण्यासह समाजकार्यासाठी काही तरी करणे गरजेचे असल्याचे म्हटले. त्यानंतर जनजागृती करण्याचा निर्णय झाला. रायडर्सच्या ग्रुपमध्ये शैलेंद्र विटोरे, अॅड. सचिन पन्हाळे, मयूर सोनवणे, संदीप सोनवणे, आनंद करडेल, विजय गव्हाणे, अरविंद पाथ्रीकर, डॉ. अजय सांबरे, संजय डोणगावकर, अभय करमरकर, अविनाश पवार आदींचा समावेश आहे. यातील काही जण डॉक्टर, वकील, कृषी क्षेत्रातील नामवंत, बँक व्यवस्थापक आहेत.

लेह,मनालीचा खडतर प्रवास बुलेटवर :रॉयल ब्रदर्स रायडर्स ग्रुपने सुरुवातीला खडतर प्रवासाची तयारी म्हणून दोन महिने गोगाबाबा टेकडीवर चढण्याचा सराव केला. त्यानंतर त्यांनी १३ बुलेट रेल्वेने दिल्लीला पाठवल्या. सर्व जण विमानाने दिल्लीला पोहोचले आणि या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला ते दिल्ली ते अमृतसर, पाटणी टॉप ते जम्मू तसेच पुढे कारगिल- लेह येथे पोहोचले. त्यानंतर साडेसतरा हजार फूट उंचीवरील खरदुंगला ते नुबरा व्हॅली असा प्रवास करत ते लेहला आले. तेथून पॅगाँग लेक येथे गेले. त्यानंतर उणे चार सेल्सियस अंश तापमान असलेल्या सरचू येथे पोहोचले. शेवटच्या टप्प्यात मनाली, चंदिगडमार्गे दिल्लीला परतले. १६ दिवसांत साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी दुर्गम भागातील नागरिकांशी संवादही साधला आहे.

साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास
संपूर्णदुर्गम भागात बुलेटवरून प्रवास करण्याचा अानंदही वेगळा होता. ज्या ठिकाणी दहा ते बारा घरे असायची अशा ठिकाणीसुद्धा रायडर्सनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासंबंधी लोकांशी संवाद साधला. तसेच महिला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. थ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रँचोच्या शाळेलाही त्यांनी भेट दिली.