आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेव्ह गर्ल चाइल्ड’चा संदेश देत 'देवगिरी’तील विद्यार्थ्यांनी सायकलवर 300 किमीचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देवगिरी व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या सायकलिंग क्लबच्या वतीने ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ मोहीम राबवण्यात आली. आकाश उदासी, ओजस पुरोहित, दीपक चव्हाण, कृष्णा हटकर, गणेश दिवेकर वर्षा ससाणे या सहा विद्यार्थ्यांनी सायकलवर औरंगाबाद-बीड-औरंगाबाद असा ३०० किलोमीटरचा प्रवास करत अनेक गावांत स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा यासारख्या विषयांवर जनजागृती केली. 
 
या वर्षीपासून महाविद्यालयात ‘देवगिरी सायकलिंग क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. या ‘क्लब’च्या वतीने ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत ‘क्लब’चे मुख्य संयोजक प्रा. चंद्रकांत फड म्हणाले, स्त्री भ्रूणहत्या, महिला अत्याचार आदींबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
 
 पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी पाचोडपर्यंतचा ६० किमीचा प्रवास करून तेथील शिवछत्रपती महाविद्यालय जवाहर विद्यालयात, तर दुसऱ्या दिवशी गेवराईतील आर. बी. अट्टल महाविद्यालय तसेच बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, श्री शिवाजी विद्यालय, यशवंत विद्यालय आदी ठिकाणी स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा यासारख्या विषयांवर जनजागृती केली. 
 
कौतुकाचा वर्षाव 
औरंगाबादेत परतलेल्या विद्यार्थ्यांचे हार, फटाके ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. महाविद्यालयात झालेल्या ‘क्वासार्स-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवात बीव्हीजीचे संचालक हनुमंत गायकवाड, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 
 
स्त्री भ्रूणहत्येसारखे प्रकार रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होत असले तरी समाजात यासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढे यायला हवे. आमच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे या मोहिमेचे नेतृत्वही एका मुलीने केले. हे कौतुकास्पद असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी या वेळी सांगितले. 
 
या विद्यार्थ्यांना प्रा. चंद्रकांत फड, प्रा. मंगेश दसरे, प्रा. रमण करडे, रूपेश रेब्बा आदींचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत प्रा. मंगेश दसरे विद्यार्थ्यांसमवेत होते. ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ मोहिमेत सहभागी झालेले आकाश उदासी, ओजस पुरोहित, दीपक चव्हाण, कृष्णा हटकर, गणेश दिवेकर,  वर्षा ससाणे. 
 
बातम्या आणखी आहेत...