आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री सन्मानासाठी खारीचा वाटा उचलणारी महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात बलात्कार, विनयभंग आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांनी कळस गाठलाय. मुलींना या जगात येण्यापूर्वी आईच्या गर्भातच मारण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. शैलजा मुंशी या सर्वसामान्य गृहिणीने या गंभीर विषयाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत त्या शहरभर स्त्री भ्रूणहत्या थांबवण्याचा संदेश देणार्‍या पोस्टरचे वाटप करतात, तर शाळाशाळांत व्याख्याने घेतात. तसेच स्त्रियांना सन्मानपूर्वक वागवण्याबाबत प्रबोधनही करतात.

स्त्रियांवरील अत्याचाराकडे समाजाचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक अशा घटना थांबवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून राज्यात स्त्रीभ्रूण हत्येविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले. अनेक संघटना तसेच शासनाच्या वतीने हे अघोरी प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी शैलजा मुंशी यांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे.

पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागरण
साहित्यातील पदवीधर असणार्‍या मुंशी यांनी वृत्तपत्रात या विषयावर लेखन केले. सोबतच चित्र अधिक परिणामकारक ठरू शकतील असा विचार आला. यामुळेच त्यांनी स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ ही मोहीम सुरू केली. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्त्री भ्रूणहत्येसंबंधी काही चित्रे निवडली. त्यास अनुरूप असा मजकूर तयार केला. या चित्रांचे स्वखर्चातून पोस्टर्स तयार केले. यांचे वाटप करून त्या स्त्री भ्रूणहत्या थांबवण्याचा संदेश देत आहेत.

शाळा पहिले टार्गेट
हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सार्वजनिक ठिकाणी जातात. शहरात सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम असेल तर त्या तेथे पोहोचतात. आयोजकांची परवानगी घेऊन तेथे पोस्टर्सचे वाटप करतात. या विषयावर मतही व्यक्त करतात. मात्र, त्यांचे पहिले टार्गेट शाळा हेच आहे. या वयात मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. यामुळे मुंशी शाळांतील मुलांमध्ये पोस्टर्सचे वाटप करून त्यांचे सोप्या व हलक्याफुलक्या शब्दात प्रबोधन करतात. हे करतानाच महिलांचा आदर राखणे, आपल्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देतात. आतापर्यंत महानगरपालिकेच्या 10 ते 12 शाळांत त्यांनी हे कार्यक्रम केले आहेत. तसेच ललित कला भवन, बालसदन, महानगरपालिकेची रुग्णालये, ब्यूटी पॉर्लर आणि महिला महाविद्यालयात जाऊन त्यांनी पोस्टर्सचे वाटप केले आहे.