आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Savitri Bai Phule Jayanti Celebration In Maharashtra

बालिका दिन विशेष - सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांनी ज्ञानाला रजा देऊ नये : वसंत डावखरे
शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठानतर्फे शनिवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शिक्षणमहर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. आर. माने, आमदार विक्रम काळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

डावखरे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या काळात स्त्रीला पाहिजे तेवढे स्वातंत्र्य नव्हते. त्यासाठी त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्याचे काम शिक्षकांचे असल्यामुळे मागण्या मांडताना ज्ञानाला रजा देऊ नये. शिक्षणामुळे आज महत्त्व प्राप्त होत असल्यामुळे शिक्षकांनी प्रेरणादायी काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार काळे म्हणाले, विद्यार्थिदशेपासून कै. वसंतराव काळे यांनी काम केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व त्यांचे कार्य समाजाला समजावे, या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येत आहे. राज्य शासन ठरावीक शिक्षकांना पुरस्कार देते, परंतु या पुरस्कारात विविध शाळांतील शिक्षकांचा गौरव करण्यात येणार असून दरवर्षी असा कार्यक्रम घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी शिक्षकांना फाइल तयार करावी लागते. त्यातच त्यांचा छळ होतो; परंतु वसंतराव काळे यांच्या प्रतिष्ठानने सुरू केलेल्या पुरस्कारामुळे शिक्षकांनी उत्साहाने विद्यार्थ्यांची जडणघडण करावी, असा उद्देश ठेवला आहे. आज शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात राजेश टोपे म्हणाले, शिक्षक हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आधारवड असतात. समाजाचा खरा आधारस्तंभ शिक्षक असल्यामुळे अद्ययावत ज्ञान असलेल्या शिक्षकांची गरज आहे. शिक्षण क्षेत्राला समर्पित भावनेने काम करण्याची गरज निर्माण झाली असून गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी कार्यक्रमात दिलीप खंडेराय यांच्या विविध नृत्यकलांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमात आबासाहेब जगताप, मुख्याध्यापक एस. पी. जवळकर, युनूस पटेल यांच्यासह मराठवाड्यातील शिक्षक, संस्थाचालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप इंगळे यांनी केले.
या शिक्षकांचा झाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव
औरंगाबाद जिल्ह्यातील मयूरा पटेल, खान आरेफा बेगम, प्रमोद कुमावत, प्रा. डॉ. देहघन मोहंमद हसन, प्रा. डॉ. संजय जामकर, प्रा. डॉ. रामराव माने जालना जिल्ह्यातील प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, विजय उबरहंडे, गजानन वाळके, कांतराव लहाने, संजय टिकारिया, प्रा. डॉ. राजीव वाडेकर तसेच परभणी जिल्ह्यातील रामकिशन मखमले, व्यंकट गुदे, प्रा. डॉ. राजेश देशमुख, प्राचार्य विलास पाटील, डॉ. सचिन पाठक, प्रा. डॉ. पठाण महंमद कलिमउल्ला खान असदुल्ला खान याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातील आनंद गायकवाड, एकनाथ कऱ्हाळे, सुधाकर मेटकर, प्रा. डॉ. शिवदास हमंद, ज्ञानदेव श्रीमंगल, अब्दुल सलीम खान अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

जीवनगौरव पुरस्कार हा विद्यार्थ्यांचा आहे
फॅक्टरीत काम करताना शिक्षण क्षेत्राकडे वळलो. याचे श्रेय बापूसाहेब काळदाते, वसंतराव काळे यांना जाते. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. हा पुरस्कार जेएनईसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आहे, असे उद्गार प्रा. प्रतापराव बोराडे यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना काढले.

कर्तृत्व सिद्ध करा : वर्षा ठाकूर
वुमन्स फोरम व कास्ट्राइब कर्मचारी महासंघ यांच्या विद्यमाने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. स्मिता अवचार यांची उपस्थिती होती. वुमन फोरमच्या अध्यक्षा कमल मनोरे यांनी प्रास्ताविक केले. \\

ठाकूर म्हणाल्या, सावित्रीबाईंनी कडव्या संघर्षाशी झुंज दिली म्हणून आपण इथे आहोत. याची जाणीव प्रत्येकीने ठेवायला हवी. त्यासोबतच महिलांपुढील आव्हाने संपलेली नसून त्याचे रूपांतरण झाले आहे, याचेही भान ठेवायला हवे. आपण महिला असल्याचे कारण पुढे करून कुठलाही फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नका. आपण आधी व्यक्ती आहोत, नंतर महिला असा विचार करून प्रत्येक महिलेने जीवन जगायला हवे. मी आधी एक अधिकारी आहे, नंतर महिला अधिकारी आहे. आपण जेव्हा बदलू, तेव्हा जग बदलणार आहे, हे कायम स्मरणात ठेवा.

आम्ही तुमचा आदर करतो : "आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुमच्या मेहनतीला सलाम करतो. तुम्ही संपूर्ण परिवाराची काळजी घेऊन नोकरी करत आर्थिक हातभारही लावता, म्हणून तुम्हाला सलाम' असे प्रत्येक पुरुष कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीला, बहिणीला, आईला आणि मुलीला म्हणावे, असे आवाहन वर्षा ठाकूर यांनी आज विविध कार्यक्रमांप्रसंगी केले.

समानतेसाठी उभे राहा
महिलांसाठी सावित्रीबाईंनी प्रचंड संघर्षाला तोंड दिले. त्या वेळी त्यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला ती बदलली. मात्र, एकूणच महिलांसमोरील आव्हाने संपलेली नाहीत. शिक्षणामुळे अन्याय- अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची दृष्टी मिळाली. मात्र, त्याचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी आत्मशक्तीची गरज आहे. महिला म्हणून आपण वेगळे राहून संघर्ष करणे, आपले अस्तित्व सिद्ध करणे अपेक्षित नाही, तर पुरुषांना सोबत घेऊन आपले वेगळेपण आपण दाखवायला हवे. आपण समाजाचा भाग आहोत, समाजापासून वेगळे नाहीत. डॉ. स्मिता अवचार