आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीस वर्षांपासून सुरू आहे ज्येष्ठ अभ्यासकाची अविरत विचारयात्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले उभे आयुष्य स्वातंत्र्यलढय़ासाठी अर्पण करणार्‍या, प्रसंगी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी विचारांचा प्रसार एक अधिकारी सार्‍या जगात करत आहे. शासकीय सेवेत मोठय़ा पदावर कार्यरत असणारी ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून सावरकरांच्या जीवनावर विविध कार्यक्रम सादर करते. त्यांचे हे कार्यक्रम विनामूल्य असतात. लवकरच औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात त्यांची ही विचारयात्रा सुरू होत आहे.

या सावरकरभक्ताचे नाव आहे सतीश भिडे. ते मुंबई येथे मंत्रालयात नोकरी करतात. येत्या 30 नोव्हेंबर रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. जातीयता व अंधर्शद्धा निर्मूलन करण्याच्या उद्देशाने त्यांनी 25 ऑगस्ट 1982 रोजी सावरकरांचे विचार लोकांसमोर मांडण्यास सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रासह परदेशातही सावरकरांवरील कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहेत. आता ते सेवानिवृत्तीनंतरचा काळ मराठवाड्यात सत्कारणी लावणार आहेत

फक्त तबला-पेटीची साथसंगत

ते सावरकरांचे जीवन-चरित्र अगदी सहज आणि सोप्या भाषेत, गाणी म्हणून, उदाहरणे देऊन उलगडतात. आयोजकांनी फक्त तबला आणि पेटीची व्यवस्था करावी, एवढीच त्यांची अट असते. कोणतेही मानधन न घेता अगदी विनामूल्य ते सावरकरांचे विचार लोकांसमोर मांडतात. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अखंड भारतात सावरकरांचे विचार पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. लवकरच ते औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात विनामूल्य कार्यक्रम सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातासमुद्रापार गेली गाथा

सतीश भिडे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत सावरकरांचे जीवन-चरित्र लोकांसमोर मांडले. तीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी दुबई आणि अबुधाबी येथेसुद्धा कार्यक्रम घेतले आहेत. तेथेही त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ते विनामूल्य कार्यक्रम करत असले तरी लोक त्यांना देणगीच्या स्वरूपात पैसे देतात. देणगी स्वरूपात मिळालेले हे पैसे ते मुंबई येथील नितीन म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द करतात. मग म्हात्रे हा पैसा सैनिकी शिक्षण घेणार्‍या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करतात.

झोपडपट्टीपासून वेश्यालयांपर्यंत

भिडे यांनी केलेल्या कार्यक्रमांना ठिकठिकाणी प्रतिसाद मिळतो. त्यांनी मुंबई-पुण्यातील वेश्यालयांमध्ये जाऊन तेथेसुद्धा सावरकरांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर चरस-गांजाचे अड्डे, दलित वस्ती, झोपडपट्टी आदी परिसरातही त्यांनी कार्यक्रमांचे सादरीकरण करून प्रशंसा मिळवली.

दिग्गजांनी लावली हजेरी

भिडे यांनी आतापर्यंत देशविदेशात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हजारो कार्यक्रम सादर केले आहेत. या कार्यक्रमांना नानासाहेब धर्माधिकारी, गगनगिरी महाराज, सुधीर फडके, प्रमोद नवलकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावून त्यांची पाठ थोपटली. तसेच नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमाला कम्युनिस्ट पक्षाचे राजेश भोरे यांनीसुद्धा हजेरी लावल्याचे भिडे यांनी सांगितले.

सर्वधर्मीयांचा सहभाग

भिडे यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यक्रमांमध्ये निवेदनाच्या आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये सावरकरांचे विचार रुजवले. त्यांचा हा कार्यक्रम म्हणजे समाजोपयोगी प्रबोधनच आहे. त्यांच्या या कार्यक्रमांना नेहमीच चांगली गर्दी होते. दलित वस्त्यांमध्ये सादर केलेल्या कार्यक्रमांना आतापर्यंत सर्वात जास्त प्रतिसाद मिळाल्याचेही भिडे यांनी सांगितले.

एक देव एक देश एक आशा..

सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द बहाल केले आहेत. किंबहुना मराठी भाषा त्यांनी दिलेल्या शब्दांमुळेच फुलली. ते गेय कवितांच्या माध्यमातून लोकांसमोर सावरकर उभा करतात.

‘शांती ही मुर्दाडांची असते,

क्रांती ही र्मदाची असते..’

असे सांगत पुन्हा एकदा

‘एक देव एक देश एक आशा,

एक जाती एक जीव एक भाषा..’

अशा कविता सादर करून सावरकरांचे जीवन उलगडत जातात.