आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलआयसीच्‍या चेकद्वारे ‘एसबीआय’ला पाच लाखांना गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोलकाता येथील एका भामट्याने एलआयसीचा बनावट चेक तयार करून शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. फसवणूक करणार्‍या सुरजित दत्ता नावाच्या व्यक्तीचे कोलकात्यातील इंडसइंड बँकेत खाते आहे. हा प्रकार एसबीआयच्या लक्षात आल्यानंतर इंडसइंड बँकेतील दत्ताचे खाते गोठवण्यात आले.

वटलेल्या चेकचे पैसे इंडसइंड बँकेतच जमा असून बनावट चेक कसा वटला गेला, असा प्रश्न एसबीआयच्या अधिकार्‍यांना पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चेक तपासण्याच्या मशीनमध्ये बनावट चेक सापडला नाही. या प्रकरणी एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक कमल किशोर मातू यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद येथे चेक क्लिअरन्सची जबाबदारी रिझर्व्ह बँकेने पंजाब नॅशनल बँकेकडे सोपवली आहे. 29 जुलै 2013 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिडकोतील एन-5 शाखेत उपस्थित असताना चार लाख 98 हजार 555 रुपयांचा 505561 या क्रमांकाचा चेक क्लिअर झाल्याचे कमल किशोर यांच्या लक्षात आले. एसबीआयमधून चेकपोटी ही रक्कम जालना रोडवरील इंडसइंड बँकेत सुरजित दत्ता नावाच्या व्यक्तीच्या नावावर जमा झाली. या व्यक्तीचे खाते कोलकाता येथे इंडसइंड बँकेत आहे. मात्र, त्याने यापूर्वी 505561 या क्रमांकाचा एलआयसीचा दहा हजारांचा चेक वटवला होता. एसबीआयमध्ये मशीनद्वारे प्रत्येक चेक तपासण्याची जबाबदारी दीपा एस. आनंदगाओंकर यांच्याकडे आहे. त्यांनीच तो चेक पास केला. मात्र, मशीननेही तो खरा असल्याचा निर्वाळा दिला. नंतर मात्र या चेकमध्ये गडबड असल्याचे समोर आले आणि पत्रव्यवहार सुरू झाला. हे पैसे इंडसइंड बँकेला परत मागण्यात आले आहेत. एसबीआयतर्फे या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात येत आहे. सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.

एकाच क्रमांकाचा चेक बनवून फसवले

उपनिरीक्षक खटावकर म्हणाले, सुरजितला झारखंडच्या एलआयसी शाखेने दहा हजारांचा चेक दिला होता. तो चेक वटवून त्याने त्याच क्रमांकाचा पाच लाखांचा दुसरा बनावट चेक बनवला व बँकेला फसवले.