आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एससी'च्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीचे मोफत वर्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रिलायबल अकॅडमी समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील ६० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वर्षभर मोफत एमपीएससीचे क्लासेस घेण्यात येणार आहेत. प्रतिविद्यार्थी १७ हजार रुपये याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांसाठी एकूण १० लाख २० हजार रुपये रिलायबल अकॅडमीतर्फे खर्च केले जाणार आहेत.

समाजकल्याणच्या वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या रिलायबल अकॅडमीचे संचालक धनंजय आकात यांची भेट घेऊन सवलतीच्या दरात स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंदर्भात अकॅडमीचे संचालक आकात यांनी गांभीर्याने विचार करून तत्काळ समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त शेख जलील यांची भेट घेऊन चर्चा केली. वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत एमपीएससीचे क्लासेस घेण्यासाठी अनुकूलता दर्शवली.

निवडीपूर्वी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्यात आले. या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल. यातूनच महाराष्ट्राला कार्यक्षम आणि कुशल असे उपजिल्हाधिकारी, फौजदार, विक्रीकर निरीक्षक, सहायक निरीक्षक, तहसीलदार आदी अधिकारी लाभणार आहेत. परीक्षेसाठी लागणारी महत्त्वाची पुस्तके अकॅडमी पुरवणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे तज्ज्ञांमार्फत समुपदशेन करणे, गटचर्चा, विविध चाचणी परीक्षा घेण्यात येतील. पैठणगेट भागात वातानुकूलित सुसज्ज इमारतीत सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले जात आहे.

वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समाजकल्याण विभागाने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे महाराष्ट्राला अनेक उत्तमोत्तम प्रशासक आणि अधिकारी मिळतील. - सिद्धार्थ वाघमारे, समाजकल्याण निरीक्षक, समाजकल्याण विभाग

विद्यार्थ्यांच्या प्रगतीस हातभार
या उपक्रमामुळे मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीस हातभार लागेल. त्यांचा शैक्षणिक विकास होईल. सामाजिक बांधिलकीतून अकॅडमी उपक्रम राबवत आहे. -ज्ञानेश्वर सतकर, समन्वयक,रिलायबल
बातम्या आणखी आहेत...