आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशाची दुकानदारी बंद करा; शिक्षणाधिकार्‍यांनी फटकारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षण हक्क कायद्याचा बोजवारा उडाला आहे. वारंवार सूचना देऊनही प्रवेशादरम्यान पालकांकडून पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे प्रवेशाची दुकानदारी बंद करा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करा, या शब्दांत शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना फटकारले. शुक्रवारी (28 जून) संत एकनाथ रंगमंदिरात शिक्षण हक्क कायद्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, आर. डी. महाजन, अनिल साबळे, रमेश ठाकूर तसेच सर्व विस्तार अधिकारी, जिल्ह्यातील मराठी, स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसईच्या सर्व प्राथमिक शाळेच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक या वेळी उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा 2009 मंजूर केला आहे. या कायद्यानुसार सर्व गरीब विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य ही प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी असल्याचे उपासनी यांनी या वेळी बोलताना सांगितले.

समाजाच्याही शिक्षकाकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांचा भंग करू नका. नियम पाळा अथवा कारवाईला तयार राहा, असा इशाराही उपासनी यांनी या वेळी दिला. शाळेत नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया होते आहे की नाही, याची जबाबदारी मुख्याध्यापकाचीदेखील आहे. यापुढे शिक्षण विभागाने बोलावलेल्या सर्व महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्यध्यापकाच्या प्रतिनिधीऐवजी स्वत: मुख्याध्यापकांनीच उपस्थित राहण्याची सूचनाही या वेळी उपासनी यांनी केली.

संस्थाचालकांनी हे नियम पाळावेत
प्रत्येक शाळेत शिक्षक आणि पालक संघ असावा.
शाळेचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
गुणवत्ता आणि विद्यार्थी हितासाठी नियम पाळा
शाळेच्या वाहनांची नियमित तपासणी करा
वाहनचालकाचा परवाना तपासून पाहा
मार्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात बसवू नका.