औरंगाबाद - दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता नसताना प्रवेश शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या आरोपावरून नक्षत्रवाडी येथील पिअर्सन इंग्लिश स्कूल आणि सातारा परिसरातील आर.जे. इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांसह सहा जणांविरुद्ध सातारा पोलिसांत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आणि शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या संयुक्त तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
सातारा येथील आर. जे. इंटरनॅशनल स्कूल खडकेश्वर शिक्षण संस्थेमार्फत चालवले जाते. राघवेंद्र जोशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कोणतीही परवानगी नसताना या प्राथमिक शाळेत 183 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, तर नक्षत्रवाडी येथील शमीत एज्युकेशनल ट्रस्ट संचालित पिअर्सन इंग्लिश स्कूलनेही 183 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पालक व जिल्हा परिषदेची फसवणूक केली. शिक्षण विभागाने मागील आठवड्यात 17 शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्या वेळी शाळांकडून मान्यतेच्या कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी काही पुरावे विभागाने मागितले होते.
‘तीन दिवसांत खुलासा करा, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करण्यात का येऊ नये?’ अशी विचारणा करणारी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर 17 पैकी चार शाळांनी कारणे दाखवा नोटिसांना उत्तरे दिल्यामुळे उर्वरित शाळांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.
सहा जणांवर दखलपात्र गुन्हे :
औरंगाबाद तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बन्सी पवार यांनी सातारा ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिअर्सनचे संस्थाचालक सुरेश बनेचंद रुणवाल (32, ज्योतीनगर), सायली खटावकर (मुख्याध्यापिका) आणि विक्रोट मिश्रा (प्रशासक) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय आर. जे. चे राघवेंद्र जोशी (संस्थाचालक), सरिता संजय रडते (मुख्याध्यापिका) आणि सचिव परमेश्वर व्यंकट आदी सहा जणांवर भादंविचे कलम 187, 467 आणि 468 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आर. जे. प्रकरणाचा तपास जमादार सुदाम दाभाडे आणि पिअर्सन शाळेच्या गुन्ह्याचा तपास शेषराव चव्हाण करत आहेत.
आठ दिवसांत कारवाई
४ या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी म्हणून त्यांना जवळच्या शाळांमध्ये वर्ग करण्यात येत आहे. सोमवारपासून दोन्ही शाळांना टाळे ठोकण्यात येणार आहे. शिवाय उर्वरित 11 शाळांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही - एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी
प्रवेश दुसर्या शाळेत
४ आयसीएसईकडे आम्ही प्रस्ताव दाखल केला असून अद्याप आम्हाला मान्यता मिळालेली नाही. आम्ही 1 ते 5 पर्यंत प्रवेश दिलेले आहेत. मान्यतेसाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. केलेल्या कारवाईवर आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमच्याच संस्थेतील रिव्हरडेल शाळेत हलवणार आहोत
- राघवेंद्र जोशी, संस्थाचालक, आर. जे. इंटरनॅशनल