आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खराब रस्ता, कारला साइड देण्याच्या प्रयत्नात ‘जिसा’ शाळेची बस कलंडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - खराब रस्ता आणि समोरून येणाऱ्या कारला साइड देण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलची बस रस्त्याच्या खाली उतरून कलंडली. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत खांबवर जाऊन टेकल्यामुळे ती पलटी झाली नाही. बसमध्ये ५३ विद्यार्थी होते पण कोणालाही इजा पोहोचली नाही. ही घटना शरणापूर फाटा साई मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता घडली.
बजाजनगर वाळूज महानगरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिकतात. शुक्रवारी सकाळी ५३ विद्यार्थ्यांना घेऊन एमएच २० डीडी ०४६१ ही बस शाळेकडे निघाली होती. शाळेची वेळ साडेआठ ते दुपारी साडेतीन अशी आहे. बसचालक रावसाहेब दाभाडे नियमित वेळेत मुलांना घेऊन शाळेकडे निघाले होते. बस शरणापूर रस्त्याने भांगसीमाता गडाजवळ आली. हा रस्ता अतिशय खराब आहे. याचदरम्यान समोरून येणाऱ्या कारला साइड देण्यासाठी चालकाने प्रयत्न केला पण बसची चाके रस्त्याच्या खाली उतरली आणि ती कलंडली.

पालकांची घटनास्थळी धाव : घटनेचीमाहिती स्नेहा अर्जुन आदमाने या मुलीने रडत-रडत वडिलांना दिली. तेव्हा वडील अर्जुन आदमाने, पोपटराव आदिक, कैलास भोकरे, काकासाहेब चेळेकर, हनुमान भोंडवे, राजू दीक्षित, अच्युत्त काळे, रवींद्र बेदमुथा, किशोर राका, रमण मुथा आदी पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी शाळेचे प्राचार्य के. प्रकाश, सीईओ बुंदलिया, जितेंद्र छाजेड यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप पालकांनी केला. अर्जुन आदमाने आणि इतर पालक वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले आणि शाळा व्यवस्थापनाविरूध्द तक्रार दिली.

नेहमीचा मार्ग बदलून बस...
विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शाळा प्रशासनाने बजाजनगर-तिरंगा चौक-एएस क्लब-नगरनाका असा बसचा मार्ग ठरवून दिला होता. परंतु शाळा व्यवस्थापनाने पालकांना अंधारात ठेवून बस शरणापूर करोडी मार्गाने नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही घटना घडली, असा आरोपही पालकांनी केला.

मुले प्रचंड घाबरली
बस विजेच्या खांबावर कलंडल्याने मुले एकमेकांच्या अंगावर आदळली गेली. सुदैवाने कुणालाही जखम झाली नाही. परंतु घटनेनंतर घाबरलेल्या मुलांना बोलताही येत नव्हते. काही जण मोठमोठ्याने रडत होते. इयता नववीमध्ये शिकणारी पूनम चव्हाण ही विद्यार्थिनी चक्कर येऊन बसमध्येच कोसळली. या सर्वांना लगतच्या शेतकऱ्यांनी तसेच वाहनधारकांनी बसमधून खाली उतरविले.

हा तर निष्काळजीपणा
^हायटेंशन विजेच्या तारांच्या खांबावर बस कलंडली. जर विजेच्या तारांमधील वीजप्रवाह खांबात उतरला असता, तर मुले राहिली असती का? हा निष्काळजीपणा आहे. त्यामुळेच मी शाळा प्रशासन चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. -अर्जुन आदमाने, पालक, बजाजनगर

^ज्यांनी तक्रार दिली ते एका राजकीय पक्षाची आहेत. त्यांनी राजकारणाचा रंग देत ही तक्रार दिली आहे. वास्तविक पाहता समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देत असताना बसची चाके केवळ रस्त्याच्या खाली उतरली. बसमधील एकाही मुलाला कोणतीही इजा झालेली नाही. ज्यांनी तक्रार दिली आहे, त्यांच्याविरोधात आम्हीही तक्रार देणार आहोत. जितेंद्र छाजेड, संचालक, जैन इंटरनॅशनल स्कूल,माळीवाडा
बातम्या आणखी आहेत...