आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Bus Hit Tree, Soyagaon 14 Students Wounded

स्कूलबस झाडावर धडकली, सोयगावचे १४ विद्यार्थी गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावर चुनाभट्टीजवळ स्कूलबसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस झाडाला धडकली. या अपघातात १४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता घडली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी बसचे दरवाजे व खिडक्या तोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त स्कूलबस कालबाह्य असल्याने अपघात घडल्याचे मदत करणा-या नागरिकांनी सांगितले.

येथील सरस्वती विद्यालयाची स्कूलबस (एमएच२० एवाय ८९८८) विद्यार्थ्याना घेऊन मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता सोयगाव- शेंदुर्णी मार्गावरून शाळेकडे निघली होती. सोयगावहून एक िकलोमीटर अंतरावर गेल्यावर स्कूलबसचे स्टेअरिंग रॉड तुटले. रॉड तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती झाडावर धडकली. अपघातात १४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी मदतीसाठी गाडीकडे धाव घेतली. गाडीच्या काचा व दरवाजे तोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. मात्र, चालकाच्या शेजारील सीटवर बसलेले दोन विद्यार्थी सीटखाली अडकले होते. त्यांनाही पत्रा फाडून बाहेर काढण्यात आले. या वेळी एक शेतकरी भास्कर चौधरी यांनी पालकांना अपघाताची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. माहिती मिळताच पोलिसांच्या फौजफाट्यासह पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अडकलेल्या कृष्णा रवी काळे व अन्य एका विद्यार्थ्याला दीड तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले.

गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याला तत्काळ उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये भूषण रामचंद्र आगे (१३), आरती झंवर (१४), अश्विनी आगे (११), पायल बिर्ला (१५), समता एकनाथ चौधरी (१५), विशाखा विनोद काळे (१४), सायली काळे (१५), सुष्मिता पाटील (१४), मीना वरकड (१५), मित्तल राजेंद्र वरकड (१४), आदित्य युवराज काळे, धीरज वसंत कारके यांना सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीना खान व कर्मचारी रितेश पारधी, परिचारिका मनीषा वाघ, सुजाता बोराडे, पवन चव्हाण, सुनील वानखेडे, रवी शेळके यांनी उपचार केले. परंतु ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना सर्वांना जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातानंतर स्कूल बसचालक नितीन गुजर रा. शेंदुर्णी हा फरार झाला. हा अपघात रस्त्यावर अचानक चारपाच कुत्रे आल्याने झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. परंतु स्कूल वाहन अतिशय जुनाट असल्याचे दिसून आले. शाळा प्रशासन व पालकांनी याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे.

शिक्षणाचे तीनतेरा
सोयगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा असताना शाळेत दर्जेदार व योग्य शिक्षण दिले जात नसल्याने येथील शिक्षक व पालकांनी आपल्या मुलांना जळगाव किंवा शेंदुर्णी परिसरातील शाळांमध्ये पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोयगाव शहरासह आमखेडा, गलवाडा, जरंडी आदी गावांतून हजारावर विद्यार्थी दररोज स्कूलबसने जीव मुठीत धरून शिक्षणासाठीचा प्रवास करत आहेत.

पालक आक्रमक
शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यालयाची स्कूलबस कालबाह्य व जुनाट असल्याने अपघात घडल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यापुढे स्कूलबस नवीन वापराव्यात, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नसल्याची आक्रमक भूमिका पालकांनी घेतली.