आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली ते सातवीचे विद्यार्थी घेतात एकाच वर्गात धडे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिक्षकांच्या अपुर्‍या संख्येमुळे महापालिकेच्या शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून ज्ञानार्जन करण्यात येत आहे. हा अजब प्रकार सिडको एन-9 येथील मनपाच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, या हेतूने शहरात सध्या मनपाच्या 78 शाळा सुरू आहेत. 2013-14 या शैक्षणिक वर्षाला 17 जूनपासून सुरुवात झाली. मनपाच्या शिक्षण विभागात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना दज्रेदार शिक्षण मिळत नाही. त्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळे यंदा मनपाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 52 टक्केच लागला आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे खुद्द मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मान्य केले आहे.

मनपाच्या शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी ई लर्निंग, सेमी इंग्लिश सुरू करणे, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दहा हजार ते एक लाख रुपये बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षकांची कमतरता आहे. जे शिक्षक आहेत ते शिकवण्यासाठी येत नाहीत. मुलांची पटसंख्या अगदी नगण्य आहे.

एन-9 सिडको येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत, तर पहिली ते सातवीचे विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने गुरुवार (27 जून) मनपा शाळेला भेट दिल्यानंतर आढळून आले.

याबाबत शिक्षिका रत्नप्रभा बाहळकर यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. एक शिक्षिका रजेवर आहे. एक शिक्षिका काही कामानिमित्त बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे एकाच वर्गात पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घटत आहे.

काय आहे नियम?
1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 40 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा. 81, 82 पटसंख्या असली तर पहिली ते चौथीपर्यंत शिकवणीसाठी चार शिक्षक असायला पाहिजेत. 121 ते 122 पटसंख्येस चार शिक्षक, पाचवीमध्ये 20 पटसंख्येला एक शिक्षक, सहावी व सातवीमध्ये प्रत्येकी 15 विद्यार्थी असल्यास एक पदवीधर शिक्षक, त्याला साहाय्य करण्यासाठी आणखी दोन शिक्षक असणे आवश्यक आहे, तर 150 पेक्षा अधिक पटसंख्या असल्यास उच्च र्शेणी मुख्याध्यापक असणे बंधनकारक आहे. एका वर्गात दुसर्‍या वर्गाच्या विद्यार्थ्याला बसण्याची परवानगीच नाही; पण एन- 9 सिडकोची केंद्रीय प्राथमिक शाळा याला अपवाद ठरली आहे.

शिक्षकांच्या नियुक्त्या करू
एकाच वर्गात पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकाही एकच आहे. ही बाब गंभीर आहे. सर्व केंद्रप्रमुखांना अहवाल मागितला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेथे शिक्षकांची संख्या कमी आहे तेथे तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आयुक्त, शिक्षणाधिकारी यांच्यासोबत मी स्वत: शाळेची पाहणी करणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. महेश माळवतकर, शिक्षण सभापती, मनपा.