आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा, महाविद्यालय परिसरात दररोज घडताहेत मुलींच्या छेडछाडीचे प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : शाळा, महाविद्यालयांतील मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास सुरू अाहेत. अनेक शाळा, महाविद्यालयांचे परिसर छेडछाडीचे अड्डे झाले आहेत. मात्र, टवाळखोरांवर कारवाईसाठी नियुक्त दामिनी पथकाकडे एखादीच तक्रार येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालकांचा दबाव आणि बदनामीला घाबरून मुली पोलिसांकडे जात नाहीत, असेही निदर्शनास आलेे. त्यामुळे टवाळखोरांना रोखण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांचीही पथके हवीत, असे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
एकीकडेमुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. दुसरीकडे सामाजिक दबावामुळे त्या तक्रारी करण्यापासून मागे हटत आहेत. अशा स्थितीत त्यांना टवाळखोरांचा प्रतिकार करण्यासाठी शक्ती देण्याची जबाबदारी घेऊ, असे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांिगतले. 
“दिव्य मराठी’ने आयोजित केलेल्या टॉक शोमध्ये या पदाधिकाऱ्यांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता काही उपाययोजनाही सुचवल्या. सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मंगल खिंवसरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा टॉक शो झाला. त्यात सर्वच पदाधिकाऱ्यांनी मुलींची छेड काढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे सांगितले. केवळ पोलिस टवाळखोरांना रोखू शकणार नाहीत, तर त्यासाठी राजकारण्यांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही पुढाकार घ्यावा लागेल. टवाळखोरांना पळवून लावण्यासाठी आक्रमक पावले उचलावी लागतील, असे त्यांनी सांगितले. आपण मुलींचे रक्षणकर्ते आहोत, अशी भावना वाढवण्यापेक्षा टवाळखोरांच्या मुकाबल्यासाठी मुलींना शक्ती देण्याचे कामही करावे लागेल, असे ते म्हणाले.  
 
चार दिवसांपूर्वी नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. आठ दिवसांपूर्वी टवाळ मुलांनी गारखेडा परिसरात मुलीच्या भावाला आणि वडिलांना मारहाण केली. वर्षभरापूर्वी पडेगाव परिसरातील एका शिक्षकाच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. तसेच सामूहिक बलात्काराच्या घटनांमुळे अख्खे शहर हादरले होते. या घटनांची प्रशासकीय पातळीवर गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात छेडछाडीचे प्रमाण वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

हे आहेत टवाळखोरांचे अड्डे : ‘दिव्यमराठी’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगपुरा, गुलमंडी, बजरंग चौक, पुंडलिकनगर परिसर, टीव्ही सेंटर चौक, विद्यापीठ परिसर, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, हनुमान टेकडी, शिवाजीनगर, सरस्वती भुवन महाविद्यालयासमोरील गल्ली, छत्रपती महाविद्यालय परिसर, देवगिरी शाळा, शासकीय ग्रंथालय परिसर, निराला बाजार, सरस्वती भुवन बसस्थानक टवाळखोरांचे अड्डे आहेत. 
 
दामिनी पथकाचे फलकच नाहीत : टवाळखोरांच्याया अड्ड्याजवळ कोठेही दामिनी पथकाची माहिती आणि क्रमांक सांगणारे फलक नाहीत. त्यामुळे नेमकी कोठे तक्रार करायची हे बहुतांश मुलींना माहिती नसते, असे समोर आले आहे. 

छेडछाड,विनयभंग वाढले : २०१५मध्ये विनयभंग, छेडछाडीच्या ३८३ तर २०१६ मध्ये ४३७ तक्रारी दाखल झाल्या. 

तक्रारच येत नाही : छेडछाडहोत असल्याचे दिसताच ०२४०-२२४०५००, १०९१, १०९८ आणि १०० क्रमांकावर संपर्क साधल्यास दामिनी पथक, पोलिस घटनास्थळी येतात. शाळांनीही तक्रार केली तर तत्काळ कारवाई केली जाते. अडचणीत सापडलेल्या मुलींच्या मदतीसाठी सुरक्षा नावाचे अॅप आहे. ग्रामीण पोलिसांनी महिला सुरक्षेबाबतची पुस्तिका महाविद्यालयात वाटली आहे. छेडछाडीचे प्रकार सर्रास सुरू असले तरी आमच्याकडे दिवसातून एखादीच तक्रार येते, असे पथकाच्या प्रमुखाचे म्हणणे आहे. 
अश्लील खाणाखुणा तर करतातच; पण ओढणी ओढतात, पाठीतही मारतात : टवाळखोरमुले अश्लील खाणाखुणा तर करतातच; शिवाय ओढणी ओढतात, पाठीतही मारतात, असे अनेक मुलींनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर “दिव्य मराठी’ प्रतिनिधीला सांगितले.
 
त्यापैकी काही अनुभव असे : 
१) महिनाभरापूर्वी मी मैत्रिणींसोबत भडकल गेट येथील आयटीआयजवळून जात असताना मागून भरधाव दुचाकीवर आलेल्याने माझ्या मैत्रिणीची ओढणी ओढली आणि तो पुढे जाऊन शिव्याही देऊ लागला. आम्ही खूप घाबरलो. ते पाहून दुचाकीवरच्या दुसऱ्या मुलाने जवळ येत तिचा हात धरला. आमच्यातील एकीने समयसूचकता दाखवत दामिनी पथकाला कॉल केला. पथक तत्काळ आले आणि त्यांनी त्या मुलांना ताब्यात घेतले. 

२) शासकीय ग्रंथालयाच्या मागील बाजूस उभी असणारी टवाळखोर मुले आम्हाला नेहमीच रस्त्यात अडवतात. टोमणे मारतात. अगदी हात धरून पाठीत बुक्के मारण्यापर्यंत त्यांची मजल जाते. 

३) स.भु. परिसरातील गल्ल्यांमध्ये दिवसभर टवाळखोर बसलेले असतात. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक मुलीवर ते कॉमेंट्स करतात. सायंकाळी साडेपाचनंतर त्यांचे धैर्य वाढलेले असते. ते मुलींचा पाठलागही करतात. त्याचा अनुभव घेतल्यापासून मी त्या रस्त्याने जाणे सोडले आहे. 

४) निराला बाजार परिसरात टवाळखोर मुलींच्या मागावरच असतात. ती जेथे जाईल तेेथे ते जातात आणि अश्लील खाणाखुणा करतात. मोबाइल नंबर मागतात. अगदी घरापर्यंतही पोहोचतात. 

५) छत्रपती महाविद्यालयाकडे जाणाऱ्या गल्लीत टवाळखोरांचा कायम धुमाकूळ असतो. भरधाव वेगाने दुचाकीवर येऊन ते मुलींना घाबरवतात. एखाद्या मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर तिला शिवीगाळ, मारहाणही केली जाते. 

६) देवगिरी महाविद्यालय परिसरात छेडखानीचे प्रकार नेहमीच होतात. पार्किंगमध्ये टवाळखोरांच्या झुंडीच्या झुंडी असतात. दुचाकी घेण्यासाठी आलेल्या मुलींकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली जाते. 
 
आम्ही मदत करू 
शहरात अनेकदा तरुणींना आपल्यावर ओढवलेला प्रसंग कोणाला सांगावा, असा प्रश्न पडतो. छेडछाडीविषयी कुठलीही माहिती द्यायची असल्यास तुम्ही ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीकडे कुठलाही संकोच बाळगता माहिती देऊ शकता. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल. 
संपर्क क्रमांक ९९२२९९४३२६. 

छेड काढणाऱ्याला होऊ शकतो पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास, त्यांच्या सूचना अशा 
{शाळा,महाविद्यालयांच्या बाहेरील परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. 
{ कॅम्पसबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करावेत. 
{ टवाळखोरांचे अड्डे असलेल्या भागात दामिनी पथकाच्या फेऱ्या वाढवाव्यात. 
{ दामिनी पथकाचा क्रमांक देणारे फलक ठिकठिकाणी लावावेत. 
{ शाळा, महाविद्यालयांत तक्रारीसाठी बॉक्सेस ठेवावेत. 
{ तक्रारींचा निपटारा वरिष्ठ शिक्षक, प्राध्यापकांनी करावा. 
 
अशा आहेत शिक्षा- 
{ कलम ३५४ - टक लावून पाहणे, मनाला लज्जा वाटेस असे कृत्य करणे - ते वर्षांपर्यंत तुरुंगवास. 
{ कलम ३५३ - लैंगिक छळ, शारीरिक स्पर्श, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न, अश्लील टोमणे - दोन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास 
{३५४ - विवस्त्र करण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला - तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आर्थिक दंड 
{३५४ - विकृती, अश्लील फोटोग्राफी - एक वर्ष ते तीन वर्षे तुरुंगवास आर्थिक दंड 
{ ३५४ - पाठलाग करणे, संपर्कासाठी इंटरनेट, ई-मेल, फोनचा उपयोग - पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आर्थिक दंड 
{५०९ - अश्लील टोमणे, हातवारे करणे - तीन वर्षे तुरुंगवास आर्थिक दंड 
{३२६ - अॅसिडफेक, गंभीर दुखापत करणे -दहा वर्षे ते जन्मठेप. 
{ ३२६ - अॅसिड फेकण्याचा किंवा दुखापत करण्याचा प्रयत्न करणे - पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास आर्थिक दंड.