आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फी ऑनलाइन भरण्याची सुविधा हवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - धकाधकीच्या जीवनात वेळ ही बाब खूप महत्त्वाची झाली आहे. शहरात अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडील नोकरी करत असल्यामुळे पाल्यांची शाळा व नोकरीच्या वेळा सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यातच शाळांची प्रवेश फी भरावयाची म्हटले तर तासनतास रांगेत उभे राहावे लागते, किंवा निदान दोन तीन चकरा शाळेत माराव्या लागतात. यावर तोडगा म्हणून पुण्या- मुंबईच्या धर्तीवर शाळेची फी ऑनलाइन बॅँकिंगच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वांसाठी फायद्याचे ठरेल, असे मत बहुतांश पालकांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षी शाळा सुरू झाल्या की, पालकांची मुलांच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू होते. त्यातही शाळांची फी भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. यात खूप वेळ जातो. शिवाय शाळा कोणत्या कामासाठी पैसे आकारते आहे तेदेखील काही शाळांमध्ये सांगितले जात नाही. अनेक शाळा आपले बिंग उघडकीस येऊ नये म्हणून पावती देण्यासही टाळाटाळ करतात. या मुळे पालकांची दमछाक होते. शहरातील सर्व शाळांमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर ऑनलाइन बॅँकिंगच्या आधारे प्रवेश शुल्क स्वीकारण्याची सुविधा शाळांनी उपलब्ध करून द्यावी, असे मत पालकांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले.

अशी आहे सद्य:स्थिती
शाळेत फी भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. फी भरण्यासाठी वेळ मिळाला नाही तर विलंब शुल्क म्हणून फीची रक्कम वाढत जाते. त्यापेक्षा ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध केल्यास शाळेबरोबरच पालकांचाही वेळ वाचेल. प्रीतीबाला भालेराव, पालक

सध्या शहरातील सर्व शाळांमध्ये शुल्क रोख स्वरूपातच घेतले जाते. मोठय़ा शाळांमध्ये चेक स्वीकारला जात नाही. फक्त नाथ व्हॅली शाळेत ऑनलाइन फी भरण्याची सुविधा आहे.

प्रथम शिक्षण विभागाने सर्व शाळांना संगणकीकृत करणे गरजेचे आहे. आतापर्यंत अनेक नियम लागू झाले; परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मोठय़ा शहरांतील शाळेत सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. शाळांना संकेतस्थळही करावे लागते. शरद अद्वंत, शिक्षणतज्ज्ञ

वास्तव बाहेर यईल
25 टक्के शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे शिक्षण विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. त्याप्रमाणे ऑनलाइन फी भरणे बंधनकारक करायला हवे. मात्र, काही खासगी आणि मोठय़ा शाळांचे वास्तव बाहेर येऊ नये, म्हणून ही प्रक्रिया अद्याप झालेली नाही. प्राचार्य अशोक जोशी, भास्कराचार्य

शाळांनाही सुविधा
प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षकांचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे विद्यार्थ्याचेदेखील नुकसान होते. विद्यार्थ्यांना रोज तू फी भरली का ? असे विचारावे लागते. शाळांमध्ये ऑनलाइन चालान भरण्याची सुविधा झाली तर वेळ वाचेल. काम पारदर्शकतेने करण्यास मदत होईल. प्रतिभा काकडे, शारदा मंदिर कन्या प्रशाला

चेक घेत नाहीत
शाळांमध्ये फी साठी चेक स्वीकारला जात नाही. यामुळे प्रत्येक वेळा चकरा माराव्या लागतात. शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वांसाठी सोयीचे होईल. शोभा लोखंडे, पालक