आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा पहिला दिवस: बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- तालुक्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळ्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या डीजे बैलगाडीमध्ये बसवून मिरवणुका काढून वाजत गाजत साजरा करण्यात आला. यामध्ये गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.

शिंगी जिल्हा परिषद प्रशालेत परिपाठानंतर नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन डीजे वाद्यासह त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मधुकरराव वालतुरेे, सरपंच संजय तिखेंसह ग्रामपंचायत सदस्य पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास नानासाहेब तिखे, परवीन शाह, सलीम शेख, फिरोज शाह, नवनाथ बोठे, साईनाथ कबाडे यांची उपस्थिती होती.

आसेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडीने वाजत गाजत मिरवणूक काढली. या वेळी विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सरपंच बिजला संजय शेळके, कारभारी जाधव यांच्यासह मुख्याध्यापक छोटुबाई धंतोले, वंदना तारो, महेबूब शेख इतरांची उपस्थिती होती. सिद्धपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून पहिलीतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ पेढे, गणवेश, पुस्तके खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य शिक्षकांची या वेळी उपस्थिती होती. मुलांनी फेरीदरम्यान हातात फलके घेऊन शैक्षणिकविषयी जनजागृती केली. उन्हाळी सुटीनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी मनमोकळ्या गप्पा केल्या.

खुलताबादेत ११० शाळा
खुलताबादमध्ये ११० शाळा असून १९,१४९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गणवेशासाठी ३४, ८३,२०० रुपये निधी मिळला, तर ३८ विषयांच्या ५४,१०१ पुस्तकांचे वाटप केले गेले.
शाळांना बुधवारपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवसापासून नवोदित विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी या उद्देशाने शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांची बैलगाडीतून, वाहनातून वाजतगाजत फेरी काढली. त्यानंतर चॉकलेट, पुष्पगुच्छ, पुस्तके आणि गणवेशांचे वाटप करून स्वागत करण्यात आले. सुटीनंतर एकत्र आलेल्या मित्रांच्या गप्पा झडल्या.

कन्नडमध्ये २९ जूनपर्यंत पटनोंदणी
कन्नड- या वर्षाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून झाली असून २९ जूनपर्यंत तालुक्यात पटनोंदणी पंधरवडा साजरा करण्यात येत अाहे. या कालावधीत तालुक्यातील ते १४ वर्षे वयोगटातील सर्व शाळा दखलपात्र शाळाबाह्य बालकांचे शाळा प्रवेश करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितले.

तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना यासंबंधी सोमवारी (दि. १३) आयोजित बैठकीत लाटकर यांनी सूचना दिल्या. प्रत्येक शाळास्तरावर गावात आरटीई २००९ ची जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांचे गृहभेटी, पदयात्रा, मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. गावकरी, बचत गट यांच्या मदतीने शालेय परिसर स्वच्छ करणे, रांगोळी काढणे, पानाफुलांचे तोरण बांधून, ध्वनिक्षेपकावर देशभक्तिपर गीते लावून आनंददायी वातावरण निर्माण करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत. तसेच इतिवृत्त तयार करण्याचेही आदेश दिले आहेत.

जि. प. पदाधिकाऱ्यांनी ६०० शाळा घेतल्या दत्तक
खुलताबाद- जिल्हा परिषदेच्या जवळपास ६०० शाळा जि. प. च्या पदाधिकाऱ्यांनीच दत्तक घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
तालुक्यातील ताजनापूर गाव आ. प्रशांत बंब यांनी दत्तक घेतले असून या गावातील जि. प. शाळेच्या भौतिक, शैक्षणिक सुधारणेची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी घेतली आहे. शाळेच्या प्रवेशोत्सवादरम्यान नवप्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी त्रिंबक काळे होते. कार्यक्रमाला डी. डी. काळे, काशीनाथ गायकवाड, अंकुश काळे, तलाठी के. डी. घोडके, ग्रामसेवक एस. एम. पवार, गटशिक्षणाधिकारी केवट, शालेय पोषण आहारप्रमुख देशमुख, मुख्याध्यापक आर. आर. सोनवणे, एम. आर. शेळके, डी. पी. सुरासे, एम. एस. बिडवे, एन. डब्ल्यू. उंबरकर, एन. बी. चव्हाण, डी. आर. खंडागळे, तलाठी घोडके, ग्रामसेवक सतीश पवार, सरपंच जिजाबाई गायकवाड, उपसरपंच द्वारकाबाई काळे आदी उपस्थित होते. येथे आठवीच्या वर्गास मान्यता मिळाली असून आठवी वर्गाचे उद््घाटन चौधरींच्या हस्ते झाले. चौधरी म्हणाले, ताजनापूर शाळेची स्थिती, गुणवत्ता सुधारणासाठी शाळा दत्तक घेतलेली असून प्रत्येक महिन्याला भेट देणार आहे. शाळेच्या गुणवत्तेसाठी मतभेद विसरून एकोप्याने काम करून १० महिन्यांत शाळा आदर्श करा. विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...