आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांतील खिचडी विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा - दुष्काळातही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा म्हणून राज्य शासनाने उन्हाळ्याच्या सुट्यांतही दररोज शाळेत खिचडी शिजवणे सुरू केले असले तरी शिजलेली खिचडी खाण्यासाठी शाळेत विद्यार्थी नसल्याने या उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविषयी शासनाने विद्यार्थ्यांना सूचित करून शिजलेली खिचडी मार्गी लावावी किंवा विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

वैजापूर तालुक्यात शासनादेशानुसार 387 शाळांमध्ये 387 शिक्षक व 387 खिचडी तयार करणारे मदतनीस कामाला लागले आहेत. सुट्या असूनही शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत शाळेत हजर राहत आहेत. दुष्काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा यासाठी सर्व शाळांत मुख्याध्यापकांनी शालेय समितीची बैठक घेऊन ग्रामपंचायतीमार्फत गावात दवंडी दिली. मात्र या जनजागृतीला प्रतिसाद मिळाला नाही. अधिकार्‍यांच्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात केवळ 10 ते 15 टक्के विद्यार्थी सुट्यांत खिचडीचा लाभ घेत आहेत. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची पंचायत समिती कार्यालयात 20 मे रोजी बैठक बोलावली आहे.

शिक्षक वेठीस
सर्व शिक्षकांना 1 मेपासून सुट्या लागतात. या काळात शिक्षक कुटुंबीयांसोबत गावाकडे जाण्याची आखणी करतात. मात्र, सुट्यांतही खिचडी शिजवण्याच्या शासनाच्या आदेशाने शाळेत एक शिक्षक राहणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापकांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेत आठवड्याच्या शिफ्ट लावल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.

आम्ही शाळेत दररोज 9 ते दुपारी 12 पर्यंत पोषण आहार देण्यासाठी जातो; परंतु शाळेत विद्यार्थी येत नसल्याने शेवटी खिचडी परिसरात वाटून टाकावी लागते. बी.एम. चित्ते, शिक्षक

जनजागृती करूनही खिचडी खाण्यास विद्यार्थी उत्सुक दिसत नाहीत. तालुक्यात केवळ 10 ते 15 टक्के विद्यार्थी खिचडीचा लाभ घेत आहेत. पी.एम. पवार, अधीक्षक, शालेय पोषण आहार