आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिकांना शिक्षणाचा "लोकपर्याय'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील आदिवासी, भटके विमुक्त, कोरडवाहू शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर मोठ्या प्रमाणात ऊसतोडणीसाठी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात येथे दरवर्षी जातात. ऊसतोड वा वाहतूक मजूर म्हणून काम करतात. अनेक जण बांधकाम आणि वीटभट्ट्यांवरही कामाला जातात. सप्टेंबर महिन्यात घराबाहेर पडणारे हे लोक मे महिन्याच्या अखेरीस आपल्या गावी परततात. या काळात ते कुटुंबालाही सोबत घेऊन जातात, परंतु वर्षातील अर्ध्याहून अधिक काळ घराबाहेर काढल्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण सुटते. त्यांचे आरोग्यही बिघडते. शिक्षणाअभावी या मुलांवरही आपल्या पालकांप्रमाणे ऊसतोडीसाठी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. ही बाब ओळखून भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्था म्हणजेच लोकपर्याय, सीडीटी आणि अॅक्शन्ड प्रकल्पांतर्गत वैजापूर तालुक्यातील भीमगड, तंट्या भिलनगर, पाराळा-जुनोने या गावात खास हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. बाल आनंद जीवन शाळा या वसतिगृहात मुलांच्या शिक्षणासोबतच एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

वैजापूरच का निवडले?
वैजापूर तालुका दुष्काळी व लहरी पावसाच्या प्रदेशात मोडतो. त्यामुळे येथे शेतीची कायम वाताहत असते. तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकरी कायम दुष्टचक्रात अडकलेला असतो. यामुळे त्यास दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणे किंवा ऊसतोड मजूर, वीटभट्टी, बांधकाम वा इतरत्र काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा आणि शांताराम पंदेरे ३५ वर्षांपासून या भागातील आदिवासींसाठी काम करतात. त्यांना येथील मुलांची ही समस्या जाणवली. यामुळेच गेल्या वर्षापासून त्यांनी पाराळा-जुनोने येथे खास आदिवासी मुलांसाठी बाल आनंद जीवन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शिऊर बंगल्याहून मालेगाव-नांदगाव रस्त्यावर असणारे पाराळा-जुनोने हे मराठवाड्यातील शेवटचे गाव आहे.
३० मुलांचे पालकत्व
सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेल्या बाल आनंद जीवन शाळेत गेल्या वर्षी आदिवासी आणि भटके विमुक्त समाजातील २५ बालके राहत होती. यंदा ही संख्या ३० वर गेली आहे. यात प्रत्येकी १५ मुले आणि मुलींचा समावेश आहे. ४ ते ११ वयोगटातील ही मुले पहिली ते चौथीच्या वर्गात शिकतात. त्यांना पाराळा-जुनोने गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषदेच्या वडजी, भादली आणि पाराळा गावातील शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. शाळेत नेण्या-आणण्यासाठी संस्थेचे स्वत:चे वाहन आहे. बाल आनंद जीवन शाळा हे या मुलांसाठी आठ महिन्यांचे दुसरे घरच होते. मुले येथे हक्काने राहतात. त्यांना दोन्ही वेळेस सकस, पोषक आहार, नाष्टा दिला जातो. शालेय साहित्य, कपडे हा खर्चही लोकपर्याय उचलते. थंडीत गरम कपडे, अंथरूण-पांघरूण, दर महिन्याला आरोग्य तपासणी, औषधी आदी केले जाते. सरासरी एका मुलावर दिवसाकाठी १५० रुपये खर्च लागतो.
६० बाय २० फुटांचा एक हॉल आणि एका खोलीत हे वसतिगृह चालते. हे केवळ वसतिगृह नसून येथे शिक्षणासह माणूस घडवण्याचे शिक्षण दिले जाते, असे लोकपर्याय संस्थेच्या अध्यक्षा मंगल खिवंसरा यांनी सांगितले.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न
ही मुले शाळेत औपचारिक शिक्षण घेतात; पण वसतिगृहात आल्यावरही शिक्षणाची ही प्रक्रिया सुरूच असते. येथे या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ज्ञान दिले जाते. आरोग्याच्या चांगल्या सवयी, चांगले संस्कार, नैतिक कर्तव्ये याविषयी माहिती दिली जाते, तर शिक्षणासोबतच संगीत, हस्तकला, लेझीम आणि विविध खेळांसाठीही विद्यार्थी तयार केले जातात. येथून बाहेर पडल्यावर हे विद्यार्थी इतरांत उठून दिसावेत यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर संस्थेचा भर आहे. या वसतिगृहासोबतच लोकपर्यायने तालुक्यात १६ ठिकाणी अंगणवाड्या सुरू केल्या. तेथेही मुलांना शिक्षणासोबत आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. प्रत्येक अंगणवाडीत सरासरी २५ अशा प्रकारे एकूण सुमारे ४०० चिमुकले येथे शिक्षण घेतात.

आदिवासीच देतात सेवा
आदिवासी समाजाची भाषा, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. यामुळे येथे बहुतांश याच समाजातील कर्मचारी सेवा बजावतात. डीएड झालेले सुभाष पवार सरकारी नोकरीच्या मोहात न अडकता येथे आले. राजू बागूल मुलांना संगीत, क्रीडा, व्यायामाचे प्रशिक्षण देतात. ते मुलांना शाळेत नेण्या-आणण्याची जबाबदारीही पार पाडतात. एकनाथ बागूल व्यवस्थापन बघतात. गोरख आणि मंगल सोनवणे मुलांचे केअरटेकर म्हणून २४ तास येथे राहतात. हे लोक सामाजिक जबाबदारी म्हणून हे व्रत पूर्णत्वास नेत आहेत, मंगल खिवंसरा या लोकपर्यायच्या अध्यक्षा, शांताराम पंदेरे मार्गदर्शक तर, संदीप ठाकूर समन्वयक म्हणून काम बघतात. गौरव मकासरे, दीपक बागूल व सुनीता जाधव हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात.

चिमुकल्यांसोबत दिवाळी
या मुलांसोबत मंगल खिवंसरा यांच्या सजग महिला मंचाने गेल्यावर्षी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला होता. या वेळी दिनकर बोरीकर, रश्मी बोरीकर आदींची उपस्थिती होती. या काळात मुलांचे पालक ऊसतोडणीसाठी गेले असल्याने सुट्या असतानाही ती वसतिगृहातच राहिली होती. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बालक -पालक मेळावा घेऊन पालक आपली मुले संस्थेच्या सुपूर्द करतात. उन्हाळाच्या सुट्यांत ती आपापल्या घरी जातात. तब्बल ८ महिने त्यांचा मुक्काम वसतिगृहात असतो. शहरातील सुरक्षित वातावरणात जगणाऱ्यांनी वर्षातून एकदा या वसतिगृहाला भेट देऊन ग्रामीण, आदिवासी जीवन अनुभवायला येण्याचे निमंत्रणही खिवंसरा देतात.

मराठवाडाभर राबवणार
^या मुलांच्या पालकांनी शिक्षण घेतलेले नाही. ऊसतोडीवर जात असल्यामुळे त्यांची मुलेही अशिक्षित राहतात. यामुळे या मुलांनाही हाच व्यवसाय स्वीकारावा लागतो. हे दुष्टचक्र मोडणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली. ही सुरुवात असली तरी असे प्रकल्प संपूर्ण मराठवाडा आणि मग राज्यात राबवणे गरजेचे आहे. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-संदीप ठाकूर, समन्वयक, लोकपर्याय

शिक्षण हेच पहिले पाऊल
^आदिवासी समाजाच्या समस्या खूप वेगळ्या आहेत. यासाठी शिक्षण हे पहिले पाऊल आहे. शिक्षणाअभावी त्यांच्या अनेक पिढ्यांचे नुकसान झाले; पण आता ही मुले शिकली तर त्यांच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होणार आहे. ही मुले घरी जातात तेव्हा त्यांच्या पालकांना, नातेवाइकांना, मोठ्या बहीण- भावांनाही शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतात. हेच आमचे यश आहे. -मंगल खिवंसरा, अध्यक्ष, लोकपर्याय