आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Girl Education Scholarship Issue Aurangabad

सावित्रींच्या लेकींना प्रोत्साहन भत्ता मिळेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि बालविवाहास प्रतिबंध घालण्यासाठी इयत्ता 9 वी आणि 10 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिंनींसाठी दोन वर्षापूर्वी ‘सावित्रीबाई फुले शैक्षणिक प्रोत्साहन भत्ता’ ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, शाळांच्या उदासीन धोरणामुळे ही योजना विद्यार्थिंनींपर्यंत पोहोचलीच नाही. शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर करूनदेखील अद्याप एकाही विद्यार्थिनीला या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

राज्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना इयत्ता 6 वी नंतर तर इतर शाळेतील विद्यार्थिनींना 9 वी आणि 10 वीत प्रतिवर्षी 3 हजार रुपये भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थिनींना याचा लाभ मिळत नाही. विभागात सध्या नववी आणि दहावीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींची संख्या 1 लाख 43 हजार 207 आहे. योजना कार्यान्वित झाल्यास विद्यार्थिनींची उपस्थित वाढण्यास मदत होईल. त्यासाठीच नुकतीच पुणे येथे झालेल्या बैठकीत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्‍यांना 2013-14 या वर्षातील प्रवेशित माध्यमिक विद्यार्थिनींची संख्या पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आदेश दिले आहेत
शिक्षण विभागाच्या वतीने वारंवार शाळांना प्रोत्साहन भत्त्यासाठी विद्यार्थिनींची माहिती पाठवा, असे आदेश आधीच दिलेले आहेत. मात्र, शाळांनी या संदर्भात माहिती पाठवलेली नाही. पी. बी. चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी

कडक उपाययोजना संदर्भात सूचना केल्या
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी ही योजना आहे. परंतु पालकांमध्ये या योजने विषयी जागरूकता नाही. शिवाय शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापक पालकांना योग्य प्रकारे माहिती देत नाहीत. त्यामुळे या संदर्भात कडक उपाययोजना करण्यात येत आहे. तशा सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक