आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथीच्या मुलीची छेड काढून तरुण पसार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शाळेच्या आवारात कोणीही नसल्याची संधी साधून एका तरुणाने औरंगपुर्‍यातील सरस्वती भुवन शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (2 सप्टेंबर) घडला. या घटनेची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनाने क्रांती चौक पोलिसांना पत्र दिले असून रोडरोमिओविरोधी पथक त्या तरुणाचा शोध घेत आहे.

सरस्वती भुवन शाळा सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत भरते. विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या रिक्षाचालकाने सोमवारी पाऊण तास अगोदर म्हणजे सकाळी सव्वानऊच्या सुमारास सात ते आठ विद्यार्थ्यांना शाळेत सोडले. यामध्ये चौथीतील एक विद्यार्थिनी शाळेच्या गेटमधून जात असताना तिच्यापाठोपाठ तिच्याशी बोलत बोलत एक तरुण वर्गात शिरला. या वेळी शाळेत महिला व पुरुष कर्मचारी स्वच्छता करत होते. वर्गात बसलेल्या या मुलीला नाव विचारत त्याने तिचा हात पकडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने शाळेतील बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेतले. बराच वेळ ती तेथेच रडत बसली. याचदरम्यान तो तरुण आणखी एका मुलीकडे गेला. तिचीदेखील तो छेड काढू लागल्याने तीसुद्धा तेथून लगेचच निघून गेली. यानंतर तरुणाने शाळेतून पळ काढला. मैत्रीण दिसत नसल्याने दुसरी मुलगी तिचा शोध घेण्यासाठी गेली तेव्हा बाथरूममधून रडण्याचा आवाज येत असल्याने या मुलीने तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने दरवाजा उघडत घडलेली हकीकत सांगितली. हा प्रकार मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर आज पालकांनी शाळेत धाव घेतली. यानंतर मुख्याध्यापिका हेमलता वैद्य यांनी शाळेचे सचिव, सरचिटणीस यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. दरम्यान, पालकांनी जबाबदारीचे भान ठेवूनच आपल्या पाल्यांना वेळेआधी शाळेत सोडू नये. मुलीची छेड काढणार्‍या तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती रोडरोमिओविरोधी पथकाचे उपनिरीक्षक राहुल फुला यांनी दिली.

वेळेआधी पाल्यांना शाळेत सोडू नये
यापुढे शाळेचे गेट सकाळी पावणेदहा वाजता उघडणार असून पालकांनी पाल्याला वेळेआधी शाळेत सोडू नये. रिक्षाचालकांनीदेखील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना आणून सोडावे, असे आज झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. हेमलता वैद्य, मुख्याध्यापिका, सरस्वती भुवन विद्यालय.