आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थेच्या पुढाकाराने शाळेची बिकट वाट झाली सुकर, चार महिने बुडत होती शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औराळा - पावसाळ्याचे चार महिने नदीला पाणी असल्याने कानडगावच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून नदी ओलांडून शाळेत जावे लागत. त्यामुळे पावसाळ्यात कानडगावचे हे ४० विद्यार्थी शाळेत जात नसल्याने उपस्थिती घटली होती. याची दखल घेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने नदीवर दीड लाख रुपये खर्चून ग्रामस्थांच्या मदतीने नळकांडी पूल तयार केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाणे सोईचे होणार आहे.
कानडगावचे जवळपास ८० विद्यार्थी साकेगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. परंतु कानडगाव-साकेगाव मार्गावरील नदीमध्ये पाणी असल्याने कानडगावच्या विद्यार्थ्यांना तब्बल दहा किमीचा फेरा मारून शाळेत ये-जा करावी लागत असे. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले होते. पालकही मुलींना शाळेत पाठवण्यास नकार देत होते.
परिणामी, नदी तुडुंब भरलेली असतानाही काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करण्यासाठी मार्ग काढत असत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जायची. यंदाही शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला तरी कानडगावचे विद्यार्थी शाळेत येत नसल्याने साकेगाव येथील न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव गावंडे यांनी थेट गावात येऊन शहानिशा केली असता, पालकांनी त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्याध्यापक साबळे यांनी यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यासाठी मुख्याध्यापक साबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब आव्हाळे यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाकडे पाठपुरावा केला. मंडळाने याची दखल घेऊन दीड लाख रुपयांच्या पुलाचे काम करण्यात आले आहे. नदीपात्रावर आता पूल बांधला गेल्याने पालकांसह विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांची समस्या सुटणार
नळकांडी पुल नसल्याने पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी नदीतून जावे लागत होते. मात्र, मराठवाडा प्रसारक मंडळाने पुल तयार होत असल्याने विद्यार्थ्यांची समस्या सुटणार आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्याने कामाला गती
पुलाचे काम तातडीने होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बाबासाहेब वरपे, सीताराम कदम, अशोक आव्हाळे, निवृत्ती आव्हाळे, बाबासाहेब नलावडे, उमेश कदम, रमेश नलावडे, रवींद्र कदम, गणेश आव्हाळे, भगवान काळे आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
गैरसोय टळण्यासाठी प्रयत्न
^कानडगावच्या विद्यार्थ्यांना साकेगाव येथे शिक्षण घेण्यासाठी अडचण येत होती. त्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.
- गुलाबराव साबळे, मुख्याध्यापक, न्यू हायस्कूल, साकेगाव.
मंडळाचे काम कौतुकास्पद
^दरवर्षी साकेगाव येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा किमीचा फेरा मारावा लागायचा. आता हा पूल झाल्यामुळे मुलांना साकेगाव केवळ दीड किमी अंतरावर आहे. मंडळाने केलेले पुलाचे काम कौतुकास्पद आहे.
- सुदाम नलावडे, पालक
बातम्या आणखी आहेत...