आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनगरात अखेर अ, आ, इ, ई सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील रामनगर येथे एक दिवस शाळा भरवून ती बंद करण्यात आली होती. परिणामी 21 विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळत नव्हते. या प्रकरणी डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच संतप्त गावक-यांनी वैजापूर उपशिक्षण विभागाला कुलूप ठोकले. गावक-यांचा संतापामुळे अखेर शिक्षण विभाग जागा झाला आणि लगेच शाळा उद्यापासून सुरू करा, असे आदेश अधिका-यांनी काढले. त्यानुसार आज मंगळवारपासून रामनगरातील शाळा सुरू झाली.

वैजापूर तालुक्यातील मौजे गोळेवाडी शिवारात असलेल्या या रामनगर गावात 2001 मध्ये वस्तीशाळा सुरू करण्यात आली. भव्य इमारतीसह सर्व सुविधा असलेली ही शाळा नियमित सुरू होती. अचानक मुलांची संख्या कमी असल्याने ती 2008 मध्ये बंद पडली. पुन्हा या वस्तीतील सुमारे 21 मुले शाळेत जाण्यासाठी तयार झाली. गावक-यांच्या मागणीनंतर 22 जुलै 2014 रोजी शाळेचा उद्घाटन सोहळा झाला. त्या दिवशी शाळा भरवण्यात आली; पण प्रत्यक्षात केवळ उद्घाटनपुरतीच ही शाळा भरली आणि दुस-याच दिवसापासून रामनगरच्या या 21 विद्यार्थ्यांना गोळेवाडीच्या प्राथमिक शाळेत जा, असे सांगत शाळेला कुलूप ठोकले गेले. यावर डीबी स्टारने 4 ऑगस्ट रोजी ‘रामनगरात भरली एक दिवसाची शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले.

विभागाला ठोकले कुलूप
वृत्त प्रसिद्ध होताच रामनगरचे माजी सभापती सारंगधर पाटील टिके यांच्या नेतृत्वाखाली 15 गावक-यांचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी 11 वाजता वैजापूर येथील शिक्षण विभागात धडकले. आपली कैफियत ऐकण्यासाठी तेथे कुणीच नसल्याने त्यांनी कार्यालयातील कर्मचा-यांना बाहेर काढून कुलूप ठोकले. काही वेळाने गटशिक्षणाधिकारी शिरोटे पोहोचले. संतप्त गावक-यांनी त्यांना धारेवर धरले. आमची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. जोपर्यंत शाळा सुरू करत नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप काढणार नाही, असा पवित्रा गावक-यांनी घेतला.

शिक्षकाची व्यवस्था
गटशिक्षणाधिकारी शिरोटे यांनी जिल्हा परिषदेचा लेखी आदेश येईपर्यंत उद्या मंगळवारपासून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची व्यवस्था करून शाळा सुरू करण्याचे पत्र दिले. कायमस्वरूपी शिक्षक मिळाल्यानंतर पुढील अडचणीही दूर केल्या जातील, असे आश्वासनही या वेळी त्यांनी दिले.

शाळा झाली सुरू
मंगळवारपासून शाळा सुरू झाली आहे. शिक्षणापासून वंचित 21 विद्यार्थ्यांना गुरुजी नियमित शिकवणार असल्याची माहिती मच्छिंद्र पगार, दिगंबर वाघचौरे, अब्बू पठाण, भाऊसाहेब रोठे, राजेंद्र सुरासे व अन्य गावक-यांनी दिली.
आदेश येताच कायमचे शिक्षक
आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला लेखी प्रस्ताव पाठवला आहे. वरिष्ठांचे आदेश मिळताच कायमस्वरूपी शिक्षक दिला जाईल. -एस. आर. शिरोटे, गटशिक्षणाधिकारी, वैजापूर
फोटो - रामनगरात मंगळवारी शाळा सुरू करून गुरुजींनी लगेच गावातील मुलांना शिकवण्यास प्रारंभ केला.