आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सायन्स पार्क’साठी जाहीर केलेला निधी अद्याप नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विद्यापीठात होत असलेल्या ‘सायन्स पार्क’साठी मुख्यमंत्र्यांनी दहा कोटींचा निधी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जाहीर केला होता. मात्र, तीन महिने उलटूनही एक छदामही विद्यापीठाला मिळालेला नाही. तो निधी कधी मिळेल, हे ठामपणे सांगण्याच्या परिस्थितीत विद्यापीठ प्रशासन नसल्याचे वास्तव सामोर आले आहे.

23 ऑगस्ट 2013 रोजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नाट्यगृहामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी, ‘कोल्हापूर विद्यापीठाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 50 कोटींचा निधी देण्यात आला आहे. तेव्हा त्याच न्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालाही किमान 50 कोटींचा निधी द्यावा’ अशी जाहीर मागणी प्रास्ताविकात केली होती. त्यानंतर घसघशीत निधी मिळेल, अशी आशा असताना मुख्यमंत्र्यांनी फक्त दहा कोटींवर बोळवण केली होती. आश्चर्य म्हणजे तीन महिने होत आले तरी या निधीतील एक पैसाही विद्यापीठाला प्राप्त झालेला नाही. तशी कबुलीच कुलगुरूंनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्याचवेळी या फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली असल्याची शक्यताही डॉ. पांढरीपांडे यांनी या वेळी बोलून दाखवली. दरम्यान, यंदा विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) हीरकमहोत्सव असून विद्यापीठालाही 50 वर्षे उलटून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर यूजीसीच्या 12 व्या योजनेत अधिकाधिक अनुदान मिळविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही डॉ. पांढरीपांडे यांनी सांगितले.