आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientist Raghunath Mashelkar Speaks At The 54th Convocation Of Dr. BAMU

चार ‘डी’मुळे भारत जगाचे नेतृत्व करणार असल्याचा दुर्दम्य आशावाद - शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कठोर मेहनतीशिवाय आणि अल्पसंतुष्ट राहून काहीच मिळत नाही. सरस्वती पूजन अर्थात अखंड ज्ञानोपासना शेवटच्या श्वासापर्यंत केली पाहिजे आणि मीही माझ्या गुरूकडून हाच मंत्र घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वोत्कृष्टतेचा अर्मयाद ध्यास हेच भव्य-दिव्य यशाचे खरे सूत्र असून आयुष्यभर हे सूत्र जगा, असा गुरुमंत्र विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी (11 डिसेंबर) विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना दिला.
भारावलेल्या वातावरणात; पण शिस्तीत व पारंपरिक पद्धतीने विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नाट्यगृहात पार पडला. लिखित भाषणाशिवाय डॉ. माशेलकर उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांशी बोलते झाले. ते म्हणाले, आज विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असली, तरी हा शिक्षणाचा शेवट नव्हे तर सुरुवात आहे, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावे. मला स्वत:ला वेगवेगळ्या देशांच्या 30 फेलोशिप-डॉक्टरेट मिळाल्या, संशोधनाचे कौतुक झाले; परंतु माझे गुरू भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव हे प्रत्येक वेळी ‘नॉट बॅड’ म्हणत. माझे कधीच कौतुक केले नाही. शेवटी मी काय करू म्हणजे तुम्ही ‘इम्प्रेस’ व्हाल, असे त्यांना एकदाचे विचारून टाकले. तेव्हा त्यांनीच ‘लिमिटलेस लॅडर ऑफ एक्सलन्स’चा मंत्र दिला, जो मी आज तुम्हाला देत आहे. दीड हजारांवर रिसर्च पेपर्स, 60 पेक्षा जास्त डॉक्टरेट आणि आधी ‘नोबेल’ का ‘भारतरत्न’ अशी स्थिती असताना डॉ. राव हे आजही वयाच्या 80 व्या वर्षी पहाटे साडेचारला उठून फिरतात, सायंकाळपर्यंत प्रयोगशाळेत कार्यरत राहतात. हे माझ्यासारख्या शास्त्रज्ञाला प्रेरणादायी वाटते, असेही डॉ. माशेलकर म्हणाले.
एका ‘डी’ची भारतीयांमध्ये कमी : विकसित देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू असून संशोधनावर फार मोठा खर्च होत आहे. मात्र, भारतात संशोधनासाठी अत्यल्प खर्च होत असला, तरी त्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर संशोधन होत आहे, हे नाकारता येणार नाही. मुळात संशोधन-अभ्यासासाठी लागणारी बुद्धिमत्ता, प्रतिभा भारतीयांमध्ये आहे, हे जगभरात लक्षात आल्यानंतर बाहेर देशांतील कंपन्यांनी भारतात येऊन संशोधन सुरू केले आहे. एक लाख 60 हजार भारतीय केवळ एका नामांकित कंपनीत संशोधन करत आहेत ते केवळ भारतीयांच्या ‘इंटलेक्ट’मुळेच. अर्थात, अधिकाधिक भारतीय उद्योगांनी संशोधनात पुढाकार घेऊन ज्ञानाचे धनामध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारे पोषक वातावरण विद्यापीठांमध्ये निर्माण होणे अत्यावश्यक आहे. डेमॉक्रसी (सृजनशीलतेला अभिप्रेत लोकशाही), डायव्हर्सिटी (संशोधनाला उपयुक्त विविधता), डेमोग्राफिक डेव्हिडंड (55 टक्के भारतीय पंचविशीतील) हे तीन ‘डी’ भारतामध्ये आहेतच; परंतु डिसिप्लिनचा चौथा ‘डी’ आपल्यामध्ये नाही. या चार ‘डी’च्या बळावर भारत नक्कीच जगाचे नेतृत्व करू शकेल. चीनकडे हे चार ‘डी’ नाहीत, असेही माशेलकर आवर्जून म्हणाले. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे होते. कुलसचिव डॉ. धनराज माने, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी 107 पीएचडीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली.