आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉर्पिअोच्या चालकाला डुलकी; माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना चिरडले; 4 ठार 2 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील जालना रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चार नागरिकांसाठी शनिवारची सकाळ भरधाव स्कॉर्पिअोच्या रूपाने काळ घेऊन आली. सवयीनुसार चिकलठाण्यातील हे रहिवासी शहरालगत केम्ब्रिज शाळेकडे सकाळी फिरावयास गेले असताना साडेपाचच्या सुमारास सुसाट  स्कॉर्पिअो जीपने त्यांना उडवले. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्कॉर्पिअोचा चालक घटनेनंतर गाडी सोडून फरार झाला. पहाटे चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नारायण गंगाराम वाघमारे (७२), भागीनाथ लिंबाजी गवळी (४५), अनिल विठ्ठलराव सोनवणे (४८) दगडूबा बालाजी ढवळे (६०) अशी मृतांची नावे आहेत. लहुजी बकाल (४४) आणि विजू दामोदर करवंदे (३७) गंभीर जखमी झाले.  या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा एकाच वेळी चार नागरिकांच्या मृत्यूची बातमी ऐकून या विभागातील कर्मचारीही हादरले. या विभागाच्या परिसरात मृतांचे नातेवाईकही होते. त्यामुळे शोककळा पसरली होती. 
 
१०० किमी वेगाने काळ आला...
जालना रोडवरील हॉटेल विजय राज व काळे बंधूंच्या विरुद्ध दिशेला  जात असताना जालन्याकडे सुसाट जाणाऱ्या स्कॉर्पिअोने या लोकांना उडवले. या गाडीचा वेग किमान ताशी १०० किमी असावा, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जीपच्या जोरदार धडकेने चार पादचारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकले गेले. नाल्यात किमान चार फूट पाणी  आणि चिखल होता. त्यांच्यापाठोपाठ स्कॉर्पिअोदेखील याच खड्ड्यात पडली.
 
अपघातानंतर स्काॅर्पिअाे नाल्यात...
भरधाव स्कॉर्पिअोच्या चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा, असा पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी ब्रेक लावल्याचे दिसत नाही. अपघातानंतर चालक फरार झाला.
 
पाय तुटलेल्या अवस्थेत त्यांनी केली मदतीसाठी याचना
जखमी लहुजींचा पाय या धडकेने तुटला होता. या अवस्थेतही त्यांनी एका घरात मदत मागितली. त्यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेला फोन केला. गंभीर जखमींना धूत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.  डॉक्टरांनी चौघांना तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याची मोबाइल व्हॅन पोहोचली. सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, उपनिरीक्षक संदीप शिंदे आदींनी पंचनामा केला.
 
गाडीवर भाजपचे कमळ...!
एमएच २७ एसी ५२८२ या गाडीवरील क्रमांकावरून ही गाडी अमरावतीची असल्याचे दिसत आहे. गाडीवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ असून एखाद्या पदाधिकाऱ्याची असल्याचा अंदाज अाहे. आरटीओतील नोंदीनुसार ही गाडी ऋषी जैन या व्यक्तीच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले. 
 
चालक मंगरूळपीरचा
पोलिसांनी अपघातस्थळावरून मोबाइल जप्त केला असून तो चालकाचाच असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, मोबाइल भिजलेला असल्याने बंद हाेता. प्राथमिक तपासात चालक विदर्भातील मंगरूळपीरचा असल्याचे दिसत असून औरंगाबादला कशासाठी आला होता, याचा पोलिस शोध घेत आहेत.
 
सकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास फिरायला जाणे त्यांचा होता नित्यक्रम...
चिकलठाणा परिसरातील हनुमान चौकात राहणाऱ्या आठ ते दहा जणांचा हा ग्रुप रोज सकाळी जालना रोडवर फिरायला जात असे. केम्ब्रिज शाळेच्या चौकात गेल्यानंतर तेथे बाजूला मोकळ्या जागेत काही वेळ व्यायाम करून परत यायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. शनिवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास हे लोक फिरण्यासाठी निघाले. एरवी हे लोक रोज रस्त्याच्या बाजूने चालत जात. मात्र, शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे सर्वच पादचारी जालना रोडच्या कडेने चालत होते.
 
बातम्या आणखी आहेत...