आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार व्यापार्‍याची 79 लाखांनी फसवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भंगार मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात राजस्थानच्या भिलवाडा येथील सुमीत सुराणा या व्यापार्‍याने कोकणवाडीतील अल्फा ट्रेडिंग कंपनीचे मालक अब्दुल नजीब अब्दुल हक खान (50, रा. फ्रेंड्स कॉलनी) यांना 79 लाखांना गंडवले असल्याची तक्रार न्यायालयाच्या आदेशाने क्रांती चौक पोलिसात मंगळवारी देण्यात आली.

अब्दुल नजीब खान यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 8 जून 2011 रोजी राजस्थान येथील सुमीत सुराणा हा व्यापारी त्यांच्याकडे भंगार खरेदी करण्यासाठी आला होता. अब्दुल नजीब यांनी चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे पॉलिस्टर कंपनीतून खरेदी केलेले भंगार सुराणा यास 1 कोटी 50 लाख रुपयांत विकले. सुराणाने त्यापैकी 71 लाख रुपये बँक खात्याद्वारे अब्दुल नजीब यांना दिले. उर्वरित 79 लाख रुपये देण्यास सुराणा टाळाटाळ करत होता. अब्दुल नजीब यांनी सुराणाशी वेळोवेळी संपर्क साधला. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सुराणा आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर अब्दुल नजीब यांनी 5 सप्टेंबर 2012 रोजी अँड. अविनाश बांगर यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली.

या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने 18 डिसेंबर 2012 रोजी सुराणावर विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु अब्दुल नजीब यांनी पोलिसांकडे कागदपत्रांची पूर्तता न केल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, हीच तक्रार त्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला क्रांती चौक पोलिसांकडे केली होती. या वेळी पोलिसांनी या निकालाचे नवीन आदेश आणून द्यावे, असे अब्दुल नजीब यांना सांगितले. त्यानंतर 13 जून रोजी न्यायालयाने नवीन आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी (18 जून) क्रांती चौक पोलिसांनी सुराणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव लोखंडे करीत आहेत.

जबाब नोंदवण्यासाठी पोलिस अब्दुल नजीब यांचा शोध घेत आहेत. मात्र, ते आजारी असल्याचे त्यांचे वकील बांगर हे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.