आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमानात साबूच्या 2 नव्या प्रजातींचा शोध, डॉ. लालजी सिंह यांच्या प्रयत्नांना यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जैवविविधतेचे आगार असलेल्या अंदमान व निकोबार बेटांवर साबुदाण्याच्या दोन नव्या प्रजाती आढळल्या आहेत. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संशोधक डॉ. लालजी सिंह यांनी या प्रजाती शोधल्या आहेत. ज्युरासिक युगापासून अस्तंगत पावलेल्या साबूच्या (सायकस ) या दोन प्रजातींच्या शोधामुळे या प्रजातींची भारतातील संख्या आता १४ झाली आहे. या सायकस प्रजाती  अादिवासींचे अन्न म्हणून ओळखल्या जातात.

यासंदर्भात पोर्टब्लेअर येथे कार्यरत बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे उपसंचालक डॉ. लालजी सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, साबूच्या या दोन प्रजातींपैकी  एक प्रजातीचा वृक्ष सर्वप्रथम २००१ मध्ये कोलकाता येथील बॉटनिकल गार्डनमध्ये आढळून आला. त्यानंतर मी व अलाहाबाद विद्यापीठातील वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डी.अार. मिश्रा यांनी संशोधन केले. अंदमान द्वीपसमूहातील कर्ट बर्ट द्वीप अभयारण्यात या प्रजातींची १२०० झाडे आढळून आली. त्यातील १३ झाडे पूर्ण वाढलेली आहेत. आणखी ५०० झाडे उत्तर अंदमानच्या रोस बेटावर आढळली असून त्यातील १३ पूर्ण वाढलेली आहेत. या प्रजातीला सायकस चन्नाई असे नाव देण्यात आले आहे. हे संशोधन बायोनेचर-२०१७ या अांतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.  दुसऱ्या प्रजातीला सायकस धर्मराजाई हे नाव देण्यात आले आहे.  हे संशोधन  द नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनीच्या एप्रिलच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. प्रसिद्ध भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. परमजितसिंह चन्ना व डॉ. धर्मराज मिश्रा यांची नावे या नव्या प्रजातींना देण्यात आली आहेत.

अतिप्राचीन वनस्पती
सायकस ही अतिप्राचीन, सुमारे २० ते ३० कोटी वर्षांपासून पृथ्वीवर आढळणारी वनस्पती आहे. ज्युरासिक काळात जेव्हा डायनासोर लुप्त होत होते तेव्हा सायकसही अस्तंगत होऊ लागली. भारतात नव्या प्रजातींसह १४  प्रजाती  आहेत. याला सर्वसामान्यपणे सागो पाम नावाने ओळखतात. यापैकी काही प्रजातींपासून साबुदाणा तयार करतात. झारखंडमध्ये काही प्रजातींचा भाजी म्हणून वापर करतात. या प्रजातींना जिवंत जिवाश्म म्हणूनही ओळखतात.

नव्या  प्रजातींची वैशिष्ट्ये   
सायकस धर्मराजाई या प्रजातीचे खोड काहीसे जाड व फुगलेले, फांद्याची रचना इतरांपेक्षा वेगळी, बीजुकपर्णाला (मेगास्पोरोफिल) टोकाकडे १० ते २८ हुकाप्रमाणे रचना, पर्णकावर वैशिष्ट्यपूर्ण रचना (पीटिंग), तर सायकस चन्नाईच्या मादी वृक्षाचे खोड जाड व फांद्यांची वेगळी रचना, बीजुकपर्णाच्या बाजूला २ हुकासारख्या रचना, पानाच्या मधल्या शिरेवर बीजुकांच्या पेशी, त्यावर अर्धवर्तुळाकार संरक्षक कवच.

अनेक राज्यांतील अादिवासींचे अन्न
देशात अंदमान व निकोबार द्वीपसमूह, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, प. बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, ईशान्य भारत व सिक्कीममध्ये साबूच्या प्रजाती आढळतात. अादिवासी साबूच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. याच्या बियांपासून स्टार्च पावडर बनवतात. अादिवासींच्या सण, समारंभ, लग्नात या झाडांचा सुशोभीकरणासाठी  मोठ्या प्रमाणात वापर होतो. या झाडांपासून लाकडी चमचे, लहान डबे बनवतात.
बातम्या आणखी आहेत...