औरंगाबाद - लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठवाड्यातील दुसरे विभागीय आयुक्तालय अस्तित्वात येऊ शकते, असे संकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. आयुक्तालय लातूरला असणार की नांदेडला यावर मात्र त्यांनी भाष्य केले नाही.
ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विभागीय आयुक्तालयाच्या स्थापनेचा निर्णय घेतला जाईल. यासाठी नेमका किती कालावधी लागणार हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी लोकसभेची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयुक्तालय लातूर येथे करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी घेतला होता. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी मुख्यालय लातूरहून नांदेडला हलवण्याचा निर्णय घेतला होता. याला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर कोणतीही प्रक्रिया पूर्ण न होताच घेतलेला निर्णय रद्द ठरवण्यात आला होता.