आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडकरी, तावडे, दानवे यांच्यात गुप्त खलबते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची निवड तोंडावर आली असताना माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि आमदार विनोद तावडे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी तब्बल पाऊण तास बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेत गडकरी, तावडे यांनी दानवे यांची मनधरणी केली की हिरवा कंदील दाखवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजप नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी नितीन गडकरी, विनोद तावडे आणि आमदार गिरीश महाजन विशेष हेलिकॉप्टरने औरंगाबादेत आले. विमानतळावरून ते थेट जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेथे त्यांनी स्वागतासाठी आलेल्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्या आधी गडकरी, तावडे आणि दानवे या तिघांची सुमारे पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत रावसाहेब दानवे यांच्याशिवाय विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस यांची नावे आहेत. शिवाय विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्याही नावाची चर्चा आहे. दिल्लीतून राज्यात परत आल्याने गडकरी यांच्या मताचा पक्षाला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे दुस-या टर्मसाठी इच्छुक असलेले मुनगंटीवार यांच्या पारड्यात ते वजन टाकतात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या किंवा रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात ते वजन टाकतात याकडे लक्ष लागले आहे. विदर्भाला संधी दिल्यानंतर आता मराठवाड्याला संधी मिळावी यासाठी गोपीनाथ मुंडे प्रयत्नशील असून येत्या 16 तारखेला मुंड-गडकरी भेट होणार असून त्यात प्रदेशाध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे गेल्यावेळी शर्यतीत होते तेव्हा त्यांना ‘थांबायला’ सांगण्यात आले होते. यावेळी ते प्रयत्नशील असताना गडकरी-तावडे यांनी त्यांच्याच घरी पाऊण तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान, दानवे यांची मनधरणी करण्यात आली की त्यांना ‘गो अहेड’ सांगण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपनेते खासदार गोपीनाथ मुंडे गुरुवारी रात्री औरंगाबादेत येणार होते. ते येण्याआधीही खास बैठक झाल्याने त्याला महत्त्व आहे. तिघाही नेत्यांनी या चर्चेबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिल्याने ‘सस्पेन्स’ वाढला आहे.

गडकरींचे ‘नो कॉमेंट्स’
पत्रकारांशी बोलण्यास गडकरी यांनी नकार दिला. गेल्या तीन महिन्यात मीडियाशी काहीच बोललो नाही. काही बोलायचे नाही. गप्पा मारायला नंतर येईन, असे ते म्हणाले.