आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान : इथे पिशवी का ठेवली?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकीकडे नागरिक जागरूक असताना दुसरीकडे सरकारी कार्यालये, रेल्वे व बसस्थानक, बाजारपेठा आदी ठिकाणी संशयास्पद अतिरेकी कारवाया टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी संबंधित फुटेज बघण्यासाठी मात्र यंत्रणा नसल्याचे उघड झाले.

का केली पाहणी ? : कोणत्याही शहराची सुरक्षितता जशी पोलिसांची जबाबदारी आहे, तशीच प्रत्येक नागरिकाचीही आहे. बाजारपेठा, कार्यालये, मॉल्स आदी ठिकाणी कुणी संशयास्पद वस्तू ठेवल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे किंवा वस्तू ठेवणार्‍यास हटकण्याचे काम नागरिकांकडून अपेक्षित आहे. पोलिसही असे आवाहन करतात. परंतु तसे होत नाही. कुणीही यावे, पिशवी-खेळण्यात बॉम्ब ठेवून जावे, अशी स्थिती असते. त्यामुळेच सर्वांचे जीव धोक्यात आहेत. बुधवारी पुण्यातही असेच घडले. दुर्दैवाने अशीच पुनरावृत्ती औरंगाबादेत झाली तर काय होऊ शकते, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ही चाचपणी केली.

सायंकाळी 4 वाजता प्रतिनिधी गुलमंडीवरील पार्किंगवर पोहोचले. सोबत एक पिवळ्या रंगाची नायलॉनची पिशवी होती. 4 वाजून 2 मिनिटांनी एकाने ही पिशवी दोन दुचाकींमध्ये ठेवली. या संशयास्पद पिशवीबद्दल किती जागरूकता दाखवली जाते हे हेरण्याचा हेतू यामागे होता.

शर्मा यांची जागरूकता : पार्किंगसमोर लॉटरी विक्रीचा व्यवसाय करणारे मुकुंदलाल शर्मा (50, रा. गुलमंडी) यांनी पिशवी ठेवताना बघितले आणि संबंधित प्रतिनिधींना हटकले. इथे पिशवी का ठेवता, अशा संतप्त स्वरात त्यांनी विचारणा केली. तुमचे नाव, पत्ता सांगा, असे म्हणत या प्रतिनिधींची दुचाकी, मोबाइलचा क्रमांकही टिपून घेतला. ही पाहणी कशासाठी आहे, याची माहिती दिल्यावरच शर्मा यांनी प्रश्नांच्या फैरी थांबवल्या.
शासकीय कार्यालये, मॉलची अवस्था काय?
एकीकडे गुलमंडीवर असे चित्र असताना शासकीय कार्यालये, रेल्वे व बसस्थानकांमध्ये वेगळे चित्र होते. तेथे सुरक्षिततेसाठी लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही लावण्यात आले असले तरी कॅमेर्‍यात नेमके काय टिपले जात आहे, हे पाहण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही, असे दिसून आले.

पुढे काय झाले ?
4 वाजून 45 मिनिटांपर्यंत पिशवी दुचाकीमध्येच होती. अनेक नागरिकांनी पिशवीला निरखून पाहिले. पण कोणीही पिशवीत काय आहे जाणून घेण्यात स्वारस्य दाखवले नाही. हातही लावला नाही की आजूबाजूच्या व्यावसायिकांकडे विचारणाही केली नाही. 4 वाजून 47 मिनिटांनी दोन भिकारी दुचाकीजवळ पोहोचले. त्यांनी लालचपोटी पिशवी उचलली. त्यातील खेळण्याचे रिकामे बॉक्स फेकून दिले. पिशवी झोळीत टाकून ते निघून गेले. हा प्रकार पाहून शर्मा अस्वस्थ झाले होते. प्रत्येकाने अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
रेल्वेस्थानकातील 4 कॅमेरे बंद - 16 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची आवश्यकता आहे. मात्र फक्त 9 कॅमेरे आहेत. त्यापैकी 5 कॅमेरे सुरू तर 4 बंद आहेत. नव्या रेल्वेस्थानक इमारतीत एकही कॅमेरा नाही. मात्र लवकरच 9 कॅमेरे बसवले जातील, असा दावा स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम यांनी केला.
बसस्थानकात कॅमेरेच नाहीत - दररोज किमान 20 हजार प्रवाशांची ये-जा असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. या परिसरात चोहोबाजूंनी मोटारसायकली, चारचाकी, तीनचाकी वाहने उभी केली जातात. आगारप्रमुख श्याम महाजन यांनीही सीसीटीव्हीची मागणी केलेली नाही. आगारात केवळ दोन सुरक्षा रक्षक असून आगाराबाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक बसची रक्षक तपासणी करतात, असे महाजन यांनी सांगितले.
मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालय - महापालिकेच्या दोन मुख्यालय इमारतीत 64 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातून प्रत्येक क्षण टिपला जातो, असे संगणक विभागप्रमुख अब्दुल बारी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी जिल्हाधिकारी कुणालकुमार त्यांना शक्य असेल त्या वेळी करत असतात. रेल्वे आणि बसस्थानक प्रशासन तसेच इतर महत्त्वाच्या कार्यालयप्रमुखांनी कॅमेरे लावावेत, अशी सूचना 6 ऑगस्टला होणार्‍या लोकशाही दिनात केली जाणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी किसन लवांडे यांनी दिली.
पार्किंग स्थळे असुरक्षितच - गुलमंडी या सर्वाधिक वर्दळीच्या बाजारपेठेत किंवा तेथील पार्किंगवर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. अशीच परिस्थिती शहागंज, निराला बाजार, गजानन महाराज मंदिर येथील बाजारपेठांत आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच मनपा मुख्यालयातील तळघरांच्या पार्किंगही सीसीटीव्हीविना आहेत.
प्रोझोन मॉल - शहरातील सर्वात मोठय़ा प्रोझॉन मॉलमध्ये जाणार्‍या प्रत्येक वाहनचालकाची मेटल डिटेक्टरद्वारे कसून तपासणी होते. पार्किंग व अंतर्गत भागात 117 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी 16 दरवाजे आहेत. 75 सुरक्षा रक्षक तैनात असून सर्वच दालनांजवळ फायर अलार्म सिस्टिम, स्मोक डिटेक्टर आहेत. विना क्रमांकाच्या वाहनांना मॉलमध्ये येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. असा बाका प्रसंग उद्भवला तर 10 मिनिटांत संपूर्ण मॉल रिकामा करण्याची क्षमता आमच्यात आहे असे प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे यांनी सांगितले.
रिलायन्स मार्ट.. - जवाहरनगर पोलिस ठाण्याजवळील रिलायन्स मार्ट परिसरातील पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी 10 बाय 10 चे 6शटर आणि 8 बाय 6 चे 3 असे 9 दरवाजे चारही बाजूंना आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी 35 सुरक्षा रक्षक, सुमारे 150 स्मोक डिटेक्टर आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आहे. आणिबाणीच्या प्रसंगी संपूर्ण मार्ट 7-8 मिनिटांत खाली करून ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी नेवू शकतो असे रिलायन्स मार्ट व्यवस्थापनाने सांगितले.
बिग बाजार - येथे 30 सुरक्षा रक्षक असून 20 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपत्कालीन सेवेसाठी 10 बाय 12 चे 4 दरवाजे समोरच्या बाजूने काढण्यात आलेले आहेत. स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, स्प्रिंकल सिस्टिम आणि चारही बाजूंना स्वतंत्र पंप हाऊस आहेत. आपत्कालीन सेवेसाठी 25 सुरक्षा रक्षकांचे स्वतंत्र पथक आहे. हे पथक ग्राहकांना अवघ्या पाच मिनिटांत सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर राजू वाकोडे यांनी सांगितले.
आयुक्तांचे आवाहन - पुण्यातील बॉम्बस्फोटानंतर शहरात येणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी पोलिस कडक लक्ष ठेवून आहेत, असे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले. दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोरील डस्टबिन दर दोन तासांनी तपासावी, सिनेमागृह, मॉल व्यवस्थापनाने अधिक दक्ष राहावे, कुठेही बेवारस वस्तू आढळल्यास पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर संपर्क साधावा, धार्मिक स्थळांसमोर वाहने लावू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी शहरातील 26 प्रमुख चौकांमध्ये नाकेबंदी करून वाहनांची झडती घेण्यात आली.